भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर जिल्हाउपाध्यक्षा शारदा गायकवाड यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
हॉटेल कर्मचारीला मारहाण करुन गल्ल्यातील पैसे काढून, जेसीबीच्या सहय्याने रस्ता बंद केल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- पैठण-शेवगाव रोडवर अनाधिकृत हॉटेलचे बांधकाम हटविण्याची तक्रार करुन सार्वजनिक बांधकाम कार्यालया समोर उपोषणाचा इशारा दिल्याचा राग धरुन मौजे खानापूर (ता. शेवगाव) येथील सरपंच, आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ता व त्याच्या साथीदाराने स्वत:च्या मालकीच्या हॉटेलची तोडफोड व गल्ल्यातील पैसे काढून, जेसीबीच्या सहय्याने रस्ता बंद केल्याची तक्रार भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर जिल्हाउपाध्यक्षा शारदा अंतोन गायकवाड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. तर या प्रकरणातील संबंधीत आरोपींवर गुन्हा दाखल करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
गायकवाड यांचे पैठण-शेवगाव रोडवर स्वत:च्या मालकीच्या जागेत हॉटेल आहे. त्या हॉटेल समोर गावातील सरपंचाने अनाधिकृतपणे अतिक्रमण करुन हॉटेल उभे केले आहे. याप्रकरणी सदरचे अतिक्रमण हटविण्यासाठी काही दिवसांपुर्वी शारदा गायकवाड यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अतिक्रमण हटविण्यासाठी तक्रार करुन उपोषणाचा इशारा दिला होता. याचा राग मनात धरुन सदर सरपंच, आदिवासी समाजातील सामाजिक कार्यकर्ता व त्याच्या साथीदाराने 16 ऑगस्ट रोजी रात्री हॉटेलची तोडफोड करुन, हॉटेलमधील कर्मचार्यास मारहाण करुन गल्ल्यातील दहा हजार रुपयाची रक्कम काढून घेतल्याचा आरोप केला आहे.
तर सदर आरोपींने जेसीबीने हॉटेल समोर चर खोदून रहदारीचा रस्ता बंद केल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
अतिक्रमणाची तक्रार केल्याचा राग धरुन दडपशाही, दादागिरी करणार्या सदर आरोपींविरोधात शेवगाव पोलीस स्टेशनला तक्रार करुन देखील संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला नसून, आरोपींवर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्याची मागणी शारदा गायकवाड यांनी केली आहे. अन्यथा भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर 25 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.