जे.एस.एस. गुरुकुलमध्ये गुरुपौर्णिमा साजरी
शिक्षण इंग्रजी असले तरी, मुलांवर संस्कार घडविण्याचे कार्य -आनंद कटारिया
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुल मध्ये शिक्षकांपुढे नतमस्तक होऊन आई-वडिलांचे पाद्यपूजन करुन विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी केली. आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून शाळेत हा आगळा-वेगळा उपक्रम पार पडला. यामध्ये सहाशेपेक्षा जास्त पालक सहभागी झाले होते.
प्रारंभी आर्ट ऑफ लिविंगचे गुरु पंडित प्रकाश लोखंडे, डॉ. रोहिणी गवळी व स्वाती शेटे यांनी गुरुपूजा केली. विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करुन त्यांचे आशिर्वाद घेतले. तर कार्यक्रमाला आलेल्या आपल्या आई-वडिलांची पूजा केला. मुलांनी दाखविलेल्या कृतज्ञ भावनेने आई-वडिलांचे डोळेही पाणावले. यावेळी आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षक गणेश शिरसाठ, प्राचार्य आनंद कटारिया, निकिता कटारिया, सचिन थोरात आदींसह शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकाश लोखंडे म्हणाले की, पूर्वीची गुरुकुलची शिक्षण पद्धती, गुरूंचे असलेले महत्त्व आज या केडगावच्या गुरुकुलमध्ये पहावयास मिळाले. मुलांवर संस्कार शाळेतूनच घडत असतात. गुरुप्रती कृतज्ञता व आई-वडिलांप्रती आदर व्यक्त करणारा हा उपक्रम मुलांमध्ये संस्कार रुजविणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
प्राचार्य आनंद कटारिया यांनी समाजात पाश्चात्य संस्कृतीचा पगडा निर्माण होत असताना, मुलांवर संस्कार घडविण्याचे कार्य गुरुकुल करत आहे. आई-वडिलांनी मुलांवर केलेले उपकार व त्यांच्या त्यागाची जाणीव करुन देण्यासाठी गुरुपौर्णिमाला हा उपक्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले. तर यशस्वी होण्यासाठी आई-वडिलांचे नेहमीच आशिर्वाद घेऊन घरा बाहेर पडण्याचे त्यांनी आवाहन केले.
इंग्रजी माध्यमच्या शाळेत भारतीय संस्कृतीप्रमाणे शिक्षण दिले जाते, हे पालकांना समाधान देणारे आहे. शिक्षणाबरोबर संस्काराची शिदोरी देण्याचे काम गुरुकुल करत आहे. संस्कार व संस्कृतीचा एक आगळावेगळा मिलाप या शाळेच्या कार्यक्रमातून दिसून येतो. आई-वडील हे मुलांचे पहिले गुरु असतात. मुलांनी केलेल्या पाद्यपूजनाने सर्वच भारवल्याची भावना अयोध्या कापरे या पालकांनी व्यक्त केली. यावेळी विद्यार्थ्यांना प्रसाद वाटप करण्यात आले.