शिक्षणावर खर्च झाल्याशिवाय देशाचा विकास अशक्य -कॉ. डॉ. भालचंद्र कानगो
अहमदनगर (प्रतिनिधी)- शिक्षण व्यवस्थेतील बदल चिंताजनक असून, सर्वसामान्य शिक्षणापासून लांब जात आहे. खाजगीकरण, व्यापारीकरणामुळे सर्वसामान्यांना भविष्यात शिक्षण घेणे देखील अवघड होणार आहे. शिक्षणावरती सरकारने खर्च वाढवावा, शिक्षणावर खर्च झाल्याशिवाय देशाचा विकास अशक्य आहे, असे प्रतिपादन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय सचिव कॉ. डॉ. भालचंद्र कानगो यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेचे कापड बाजार येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुभाष ठुबे (एस.एल.) यांच्या सेवापुर्तीनिमित्त झालेल्या त्यांच्या सन्मान सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले कॉ. कानगो बोलत होते. नवीन टिळक रोड येथील माऊली मंगल कार्यालयात रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सेवापुर्ती सोहळ्याप्रसंगी माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस, प्रताप बोठे, उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी टी.पी. कन्हेरकर, संस्थेचे सचिव शिवाजीराव भोर, गोरक्षनाथ कदम, संकेत कदम, अशोक झरेकर, भाऊसाहेब शिरसाठ, शरद गावडे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनिल पंडित, ज्ञानदेव पांडुळे, राजेंद्र लांडे, भाकपचे राज्य सचिव कॉ. सुभाष लांडे, कॉ. बन्सी सातपुते, प्रा. स्मिता पानसरे, आझाद ठुबे, काकासाहेब वाळुंजकर, राजेंद्र उदागे, अर्जुन पोकळे, विश्वासराव काळे, अॅड. सुरेश लगड, अॅड. शिवाजी कराळे, आप्पासाहेब ठुबे, सरपंच शरद बोठे, आबासाहेब कोकाटे, बाळासाहेब साळुंके, सरपंच गोकुळ काकडे, पीएसआय अनिकेत कासार आदींसह रयत सेवक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे कॉ. कानगो म्हणाले की, विकसित राष्ट्र दहा ते पंधरा टक्के खर्च शिक्षणावर करतात. मात्र भारतात फक्त तीन टक्के देखील खर्च शिक्षणासाठी होत नाही. शिक्षणाच्या ताकतीने देश उभा राहणार आहे. नवीन आर्थिक धोरण स्वीकारताना शिक्षणावर खर्च करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षक समाजाचा आधार स्तंभ आहे, पण सध्या सरकारने त्यांची पेन्शन काढून त्यांचा आधारच हिरावून घेतला आहे. 60 वर्षानंतर सर्वच शेतकरी, कष्टकरी, कामगारांना पेन्शन देणे ही सरकारची जबाबदारी आहे. ही भूमिका भाकपने सरकार पुढे मांडली असल्याचे कॉ. कानगो यांनी स्पष्ट केले.
खाजगीकरणामुळे लोककल्याणकारी संकल्पना बदलली. भारतात परदेशी विद्यापीठ येण्यासाठी गुणवत्तेची अट शिथिल केल्यामुळे दर्जाहीन विद्यापीठ येण्याचा धोका आहे. समाज सावरण्यासाठी शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. पुरोगामी विचाराने शिक्षकांनी समाज घडविण्याची गरज असल्याचेही कॉ. कानगो म्हणाले.

या सेवापुर्ती सोहळ्यात मुख्याध्यापक सुभाष ठुबे (एस.एल.) व छायाताई सुभाष ठुबे यांचा उपस्थितांच्या हस्ते सपत्नीक मानपत्र, स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविकात प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके म्हणाले की, सेवाभावाने 32 वर्षे मुख्याध्यापक सुभाष ठुबे (एस.एल.) यांनी ज्ञानदानाचे कार्य केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीत कार्यरत राहून विद्यार्थ्यांना त्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचे काम केले. ते चळवळीतले शिक्षक असून, रयत शिक्षण संस्थेच्या आजीव सदस्यपदी त्यांची नियुक्ती होणे, ही त्यांनी केलेल्या कार्याची पावती असल्याचे सांगितले.
आझाद ठुबे म्हणाले की, खडतर कष्ट घेऊन ठुबे यांनी रयतच्या माध्यमातून उपेक्षितांना घटकांना शिक्षण दिले. विद्यार्थ्यांच्या मनात आपल्या कार्याचे प्रतिबिंब उमटावे, हा शिक्षकांना पुरस्कारापेक्षा मोठा सन्मान आहे. हे समाज मनातील दखलपात्र काम त्यांनी केले असल्याचे त्यांनी सांगितले.प्रताप बोठे पाटील यांनी वाळकी येथे कार्यरत असताना ठुबे यांच्या शैक्षणिक कार्याला उजाळा दिला. माजी विद्यार्थी ज्ञानदेव सुंबरे यांनी आयुष्य घडवलेल्या गुरुजनांना न विसरता त्यांच्या सेवापुर्ती सोहळ्यासाठी राज्यातील कानाकोपर्यातून माजी विद्यार्थी आले असल्याचे सांगितले. कॉ. स्मिता पानसरे यांनी चळवळीतला शिक्षका सेवानिवृत्तीनंतर चळवळीत सक्रीय होणार याचा आनंद असल्याचे सांगितले. या सोहळ्यास आमदार निलेश लंके यांनी भेट देऊन ठुबे यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
दादाभाऊ कळमकर म्हणाले की, कर्मवीर अण्णा व लक्ष्मीबाईंचा त्याग डोळ्यासमोर ठेवून ठुबे यांनी रयत संस्थेत कार्य केले. कानाकोपर्यातून माजी विद्यार्थी व जेथे काम केले त्या गावातील ग्रामस्थ या कार्यक्रमात एकवटले हे त्यांच्या कार्याची पावती आहे. तर राजकारणाचा घसरलेला दर्जा यावर भाष्य करुन, शिक्षक वर्गाचा पाय व विचार चुकल्यास समाज भरकटणार आहे. यामुळे शिक्षकांची जबाबदारी मोठी आहे, असे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक सुभाष ठुबे (एस.एल.) यांनी रयत शिक्षण रुजू होताना आलेला अनुभव, खडतर प्रवास व विद्यादानासाठी आलेले चांगले, वाईट अनुभव त्यांनी विशद केले. तर शिक्षकाने चांगला विचार दिल्यास समाज सुदृढ करता येतो. बिघडलेल्या समाजाला सावरण्यासाठी शिक्षकांनी जबाबदारीने वागणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मुलगी मयुरी ठुबे हिने कामात प्रामाणिक राहिल्यास समाजात अस्तित्व निर्माण करता येते, ही महत्त्वाची शिकवण गुरु असलेल्या वडिलांकडून मिळाल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला कान्हूर पठार, बाभुलवाडे, हातोला बेलवंडी, पिंपळगाव रोठा, चव्हाणवाडी, फलटण, वाळकी व शहरातील माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.