परिस्थितीवर मात करुन पुढे आलेली मुले जीवनात यशस्वी होतात -गिरीश कुलकर्णी
आफताब शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील यशवंत माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानच्या वतीने शालेय गणवेशचे वाटप करण्यात आले. स्नेहालयाचे संस्थापक गिरीश कुलकर्णी व प्रतिष्ठानचे अध्यक्ष अल्ताफ सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या गणवेश वाटप कार्यक्रमाप्रसंगी मुख्याध्यापिका निशाद शेख, उमंग ठाकरे, नवाब देशमुख, गौस शेख, तन्वीर मनियार, कैस शेख, हाजीक सय्यद, मुजीर सय्यद, शहाब सय्यद, अर्जून बेडेकर, कॅप्टन शकील सय्यद, फारुक शेख, अयान सय्यद, सरफराज शेख आदी उपस्थित होते.

गिरीश कुलकर्णी म्हणाले की, परिस्थितीवर मात करुन पुढे आलेली मुले जीवनात यशस्वी होतात. बिकट परिस्थितीमुळे आलेल्या अनेक संकटांवर मात करण्याची क्षमता निर्माण होते. आव्हानात्मक परिस्थिती ही भविष्यातील संधी घेऊन येत असते. परिस्थितीना न डगमगता शिक्षणाचे पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी केले.
अल्ताफ सय्यद म्हणाले की, मानवता हाच एक धर्म प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरजू घटकातील मुलांना आधार देण्याचे कार्य सुरु आहे. गरजू घटकातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात टिकण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक मदत दिली जात आहे. कोरोना काळात देखील गरजू कुटुंबासह विद्यार्थ्यांना विविध प्रकारची मदत देण्यात आली होती. समाजात जातीय द्वेष पसरत असताना मानवता हाच एक धर्म समजून सेवा सुरु असून, भविष्यात निराधार मुलांचे शैक्षणिक पालकत्व देखील स्वीकारण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शालेय संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत गाडे, सचिव प्रा. शशिकांत गाडे, सहसचिव रमाकांत गाडे, उपाध्यक्ष मल्हारी कचरे, खजिनदार संजय गाडे यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. पाहुण्यांचे स्वागत संगिता बनकर यांनी केले. प्रास्ताविकात मुख्याध्यापिका डॉ. निशात शेख यांनी विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध शालेय उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनिषा मगर यांनी केले. आभार उध्दव गुंड यांनी मानले.