लक्ष्मीबाई भाऊराव पाटील शाळेत पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी केली धमाल
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीच्या दोन वर्षानंतर शाळा प्रत्यक्षात बुधवार (दि.15 जून) पासून सुरु झाल्या असून, शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी कापड बाजार येथील रयत शिक्षण संस्थेच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक व माध्यमिक शाळेत फुलांचा वर्षाव, तुतारीचा निनाद, ढोल पथकाच्या गजरात मुलांचे औक्षण करुन स्वागत करण्यात आले. शाळेत एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींनी धमाल करीत, शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा केला.
विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक संजय चोपडा, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडूळे, प्राथमिकचे मुख्याध्यापक शिवाजी लंके, माध्यमिकचे प्राचार्य एस.एल. ठुबे, इंजी. विजय बेरड आदीसह विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
प्रास्ताविकात मुख्यध्यापक शिवाजी लंके यांनी विद्यार्थ्यांना शाळेची आवड निर्माण होण्यासाठी व गुणवत्ता वाढीसाठी दरवर्षी राबविण्यात येणार्या विविध उपक्रमाची माहिती देवून शाळेचा वाढता गुणवत्तेचा आलेख सादर केला. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सर्वशिक्षा अभियानातंर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे व गुलाबपुष्पाचे वाटप करण्यात आले. पाहुण्यांसह विद्यार्थ्यांनी आकाशात फुगे सोडून शाळेच्या पहिल्या दिवसाची सुरुवात केली.
ज्ञानदेव पांडूळे म्हणाले की, कोरोनानंतर मोबाईलमध्ये अडकलेले विद्यार्थी आज प्रत्यक्षात शाळेते पाहून आनंद होत आहे. प्रत्यक्ष अध्ययन पध्दती सर्वोत्तम असून, विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शाळेत राबविण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय चोपडा यांनी रयतच्या या शाळेत सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना घडविण्याचे कार्य केले जात आहे. शाळेची गुणवत्ता वाढली असून, विविध स्पर्धा परीक्षेत राज्याच्या गुणवत्ता यादीत विद्यार्थ्यांनी येण्याचा बहुमान पटकाविला आहे. अद्यावत शिक्षणाची जोड देऊन गुणवंत विद्यार्थी घडविण्याचा शाळेतील उपक्रम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.