अहमदनगर (प्रतिनिधी)- लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी असलेल्या गोविंद मोकाटे याला अटक होण्यासाठी पिडीत महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालया समोर सुरु केलेले उपोषण पोलीसांच्या आश्वासनानंतर दुसर्या दिवशी शनिवारी दुपारी (दि.5 फेब्रुवारी) मागे घेतले. भिंगार कॅम्पचे सहा. पो.नि. शिशिरकुमार देशमुख यांनी पाणी देऊन पिडीत महिलेचे उपोषण सोडवले. यावेळी आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, ज्योती पवार आदी उपस्थित होते.
जेऊर (ता. नगर) येथील राजकीय पुढारी असलेल्या गोविंद मोकाटे याने महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस स्टेशनला दोन महिन्यापुर्वी गुन्हा दाखल झाला होता. तर या प्रकरणात आरोपीवर अॅट्रॉसिटी अॅक्टप्रमाणे वाढीव कलम देखील लावण्यात आले आहे. मात्र दोन महिन्यापुर्वी लैंगिक अत्याचार व अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊन देखील आरोपी गोविंद मोकाटे याला अटक होत नसल्याने, पिडीत महिलेने पोलीस अधीक्षक कार्यालया समोर शुक्रवारी (दि.4 फेब्रुवारी) उपोषण सुरु केले होते. पोलीस प्रशासनाच्या वतीने तपास सुरु असून, लवकरच आरोपीला अटक करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.