आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पब्लिशर हाऊस असलेल्या एन मॅगझीनने घेतली दखल
अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पब्लिशर हाऊस असलेल्या एन मॅगझीनने नगरच्या युवा वकिलाच्या कार्याची दखल घेऊन देशातील टॉप थ्री वकिलांच्या यादीत अॅड. सत्यजीत कराळे पाटील यांना स्थान दिले आहे. अत्यंत कमी वयात हायप्रोफाईल केसेस, सायबर क्राईम, नार्कोटिक्स व आर्थिक फसवणुकीचे प्रकरणे पॅन इंडियात हाताळल्याच्या कार्याची दखल घेऊन त्यांना टॉप थ्रीच्या युवा वकीलांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. कराळे यांनी शहराचे नाव उंचावून, वकिली क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
एन मॅगझीन ही आंतरराष्ट्रीय दर्जाची पब्लिशर हाऊस असून, दरवर्षी वकील, उद्योजक, इंजिनिअर, पत्रकार, डॉक्टर आदी विविध क्षेत्रातील लोकांच्या कार्याचे सर्व्हेक्षण करुन देशातील टॉप टेन व टॉप थ्री मध्ये त्यांचा समावेश करुन, ती यादी आपल्या मॅगझीनमध्ये प्रकाशित करत असते.
यावर्षी नुकतेच एन मॅगझीनने देशातील 30 वर्षाच्या आतील युवा वकीलांचे सर्वेक्षण केले होते. यामध्ये 2020 साली वकिली व्यवसायात पदार्पण केलेले नगरचे अॅड. कराळे पाटील यांच्या कार्याची दखल घेतली गेली आहे. त्यांनी पुणे व मुंबई विद्यापीठातून वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आहे. अॅड. कराळे यांनी कौन बनेगा करोडपतीचा 25 लाख घोटाळा, अॅमेझॉनचा गोवा येथील घोटाळा, बिटकॉइन व क्रिप्टो करन्सी घोटाळा, क्युनेट ग्लोबल नेटवर्क मार्केटिंग घोटाळा, आलिबाग येथील होटेल रॅडिसन ब्लू चे झुरळ प्रकरण, फेसबुक अकाउंट क्लोनिंग तसेच पुणे येथील 87 कोटी रुपयांच्या बनावट नोटांचा घोटाळा ही महत्त्वाची हायप्रोफाईल व सायबर क्राईमची प्रकरणे हाताळल्याची दखल घेऊन त्यांना देशाच्या टॉप थ्री मध्ये स्थान दिले आहे. अॅड. कराळे नार्कोटिक्स व सायबर क्राईम स्पेशालिस्ट असून, देशातील विविध सायबर केसेस हाताळत आहे. ते मुंबई व औरंगाबादच्या उच्च न्यायालयासह इतर जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस करत असून, शहरातील प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. शिवाजीराव कराळे पाटील यांचे ते चिरंजीव आहेत.