• Wed. Feb 5th, 2025

आचारसंहितेमुळे उशिरा बदली प्रक्रिया राबवल्याने 2022 च्या बदली पात्रतेसाठी तीन वर्षे कालावधी ग्राह्य धरावा

ByMirror

May 12, 2022

कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसभा आचारसंहितेमुळे उशिरा बदली प्रक्रिया राबवल्याने 2022 च्या बदली पात्रतेसाठी तीन वर्षे कालावधी ग्राह्य धरावा, अपिलात गेलेल्या कर्मचार्‍यांचे न्यायालय व आयुक्तालय यांच्या निर्देशाप्रमाणे बदली प्रक्रियेत प्रथम प्राधान्य देण्याची मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या वतीने ग्रामविकास व जलसंधारण विभाग सचिव, नाशिक विभाग आयुक्त, मुख्यकार्यकारी अधिकारी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांना पाठविण्यात आले असल्याची माहिती संघटनेचे राज्याध्यक्ष एन.एम. पवळे, जिल्हाध्यक्ष के.के. जाधव, सरचिटणीस सुहास धीवर यांनी दिली.


जिल्हा परिषद स्तरावर बदली प्रक्रिया शासन निर्णय 15 मे 2008 नुसार नियमित वेळेत प्रतिवर्षी राबवले जाते. परंतु 2019 कालावधीतील बदली प्रक्रिया 29 मे 2019 रोजी आचारसंहिता असल्याने शासकीय तांत्रिक अडचणीमुळे उशिरा 3 जून 2019 रोजी राबविण्यात आली. त्या अनुषंगाने कर्मचार्‍यांना 7 ते 30 जून नंतर सोडण्यात आले. दुसर्‍याच दिवशी कर्मचारी बदलीच्या ठिकाणी हजर झाले होते. चालू वर्षी मे 2022 बदली प्रक्रियेत सदर कर्मचार्‍यांना विनंती बदली पात्रतेसाठी (म्हणजे तीन वर्षे पूर्ण होण्यासाठी) 7 ते 30 दिवस कमी पडत आहे. शासनामार्फत लोकसभा आचारसंहिता तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने बदली प्रक्रिया उशिरा राबविल्याने बदली पात्रतेत ते तीन वर्षे पूर्ण होत नसल्याने 2019 मध्ये बदली झालेले कर्मचारी मे 2022 च्या बदली प्रक्रियेत अपात्र ठरत आहेत. यामध्ये कर्मचार्‍यांचा कोणताही दोष नाही. ज्या कर्मचार्‍यांच्या आचारसंहितेमुळे बदली प्रक्रिया उशिरा राबविल्याने मे 2022 च्या बदली पात्रतेसाठी 7 ते 30 दिवसांची सुट मिळावी, बदली पात्रतेच्या यादीत समाविष्ट करून त्यांच्यावरील अन्याय दूर करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


2019 चे बदली प्रक्रियेत अन्याय झाल्याने अपिलात आयुक्तालय व न्यायालय यांच्याकडे गेले. त्यांच्या निकालात 2020-21 ची बदली प्रक्रियेत प्रथम प्राधान्य देण्याबाबत आयुक्तालयाने सुचविली आहे. परंतु कोरोनाची परिस्थिती निर्माण झाल्याने 2020-21 ची बदली प्रक्रिया कमी प्रमाणात राबविली गेली असल्याने कर्मचार्‍यांच्या बदल्या आयुक्तालयाने सूचित केल्याप्रमाणे प्रलंबित राहिलेल्या आहेत. त्यांचा प्राधान्यक्रम सन 2022 चे बदली प्रक्रियेत प्रथम स्वरुपात भरण्याचे निवेदनात म्हंटले आहे.


29 मे 2019 लोकसभा आचारसंहिता असल्याने उशिरा बदली प्रक्रिया 3 जून 2019 रोजी राबवल्याने सन 2022 च्या बदली पात्रतेसाठी तीन वर्षे कालावधी ग्राह्य धरावा, सन 2019 मधील अपिलात गेलेल्या कर्मचार्‍यांचे न्यायालय व आयुक्तालय यांच्या निकालानुसार बदली प्रक्रियेत प्रथम प्राधान्य देण्याची मागणी कास्ट्राईब महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी संघटनेचे राज्य व जिल्हा कार्यकारणीचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *