रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीचा उपक्रम
जीवनात कृतीचे व कर्माचे फळ निश्चित -संध्या पांडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- जीवनात कृतीचे व कर्माचे फळ निश्चित मिळतात. ते फळ चांगले का वाईट? प्रत्येकाच्या कृतीवर आधारलेले असते. यश मिळवण्यासाठी सातत्यता आवश्यक असून, अभ्यासात देखील सातत्य ठेवण्याची गरज आहे. ध्येय नसलेला विद्यार्थी जीवनात यशस्वी होवू शकत नाही, असे प्रतिपादन रोटरी क्लबच्या सचिव संध्या पांडे यांनी केले.
अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शनीच्या वतीने इयत्ता नऊवी व दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करुन, ध्येय प्राप्तीच्या दिशेने वाटचाल होण्यासाठी प्रेरणादायी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पांडे बोलत होत्या. याप्रसंगी संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, शाळेचे मुख्याध्यापक प्रभाकर भाबड, रोटरी क्लबच्या संचालिका (साक्षरता) डॉ. प्रतिभा धूत उपस्थित होत्या.
पुढे पांडे म्हणाल्या की, लक्ष गाठण्यासाठी स्वत:वरचा आत्मविश्वास महत्त्वाचा असून, लक्ष गाठण्यासाठी चांगल्या व्यक्तींकडून प्रेरणा घेतली पाहिजे. तणावमुक्त अभ्यास व जीवन आनंद देत असल्याचे सांगितले. तर पाहिजे असेल ते मिळवणे, ध्येयाला आकर्षित करणे, कृतीचे व कर्माचे नियम समजावून सांगितले. तसेच विद्यार्थ्यांना चांगल्या संगतीत राहण्याचे व एकाग्रता वाढविण्याचे आवाहन केले. या परिसंवादात तीनशे शिक्षक व वीस शिक्षकांचा सहभाग लाभला. छायाताई फिरोदिया यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ. प्रतिभा धूत यांनी आभार मानले.

