• Tue. Jul 23rd, 2024

आयपीएस अधिकारी वैभव गायकवाड व नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांना महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार प्रदान

ByMirror

Apr 17, 2022

अहमदनगर (प्रतिनिधी)- पिंपळगाव माळवी (ता. नगर) येथे महात्मा फुले युवा विचार मंच आणि सावता ग्रुपच्या वतीने गावातील पहिला आयपीएस अधिकारी वैभव गायकवाड व फिनिक्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा नेत्रदूत जालिंदर बोरुडे यांना महात्मा फुले समाजरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.
प्रा. देवराम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी मांजरसुंभा आदर्श गावचे सरपंच जालिंदर कदम, प्रा. बारस्कर सर, माजी प्राचार्य बापूसाहेब गायकवाड, पिंपळगावचे सरपंच सौ. प्रभुणे, उपसरपंच भारती बनकर आदी उपस्थित होते.
प्रा. देवराम शिंदे म्हणाले की, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिलेल्या शिक्षणाच्या संदेशाने समाजाची प्रगती होत असून, समाजाला एक दिशा मिळाली आहे. गावातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा वैभव गायकवाड स्पर्धा परीक्षेद्वारे पोलीस अधीक्षक झाला. तर जालिंदर बोरुडे यांनी दीन, दुबळ्यांना आधार देण्यासाठी फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून आरोग्य चळवळ उभी केली. मनुष्याच्या सेवेतच ईश्‍वराची सेवा असून, दोन्ही पुरस्कार्थीच्या हातून समाजाची सेवा घडत असल्याचे त्यांनी सांगितले. सरपंच जालिंदर कदम यांनी कोरोना काळात नागरिकांची गरज ओळखून फिनिक्स फाऊंडेशनच्या माध्यमातून बोरुडे यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले. नेत्रदान चळवळीच्या माध्यमातून हजारो व्यक्तींना नवदृष्टी देण्यासाठी त्यांचा सातत्याने पुढाकार असल्याचे सांगितले.
प्रास्ताविकात सोमनाथ गायकवाड यांनी महात्मा फुले युवा विचार मंच आणि सावता ग्रुपच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. आयपीएस अधिकारी वैभव गायकवाड यांनी युवकांना स्पर्धा परीक्षा देण्याचे आवाहन करुन परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. प्रा. बारस्कर यांनी स्पर्धा परीक्षेचे स्वरुप त्यामधील संधी विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण गायकवाड यांनी केले. आभार जालिंदर पुंड यांनी मानले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *