• Wed. May 15th, 2024

वाढते तापमान व ग्लोबल वॉर्मिंगच्या प्रश्‍नावर राष्ट्रीय हरित धनराई जलसंधारण क्रांतीचा आग्रह

ByMirror

Apr 27, 2024

राष्ट्रीय लोकभज्ञाक चळवळ करणार शेतकऱ्यांमध्ये जागृती

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- वाढते तापमान, भूगर्भातील कमी होत चाललेली पाणी पातळी रोखण्यासाठी व ग्लोबल वॉर्मिंग सारख्या प्रश्‍नाला तोंड देण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय लोकभज्ञाक चळवळीने राष्ट्रीय हरित धनराई जलसंधारण क्रांतीचा आग्रह धरला असल्याची माहिती चळवळीचे समन्वयक ॲड. कारभारी गवळी यांनी दिली आहे.


सन 1968 नंतर महाराष्ट्रासह देशभरात ऑइल इंजनमुळे मोठ्या प्रमाणात भूगर्भातील पाणीसाठ्यांचा उपसा सुरू झाला. पुढे विजेच्या मोटारीच्या मदतीने पाणी पंप चालविण्यात आले. लाखो शेतकऱ्यांनी पुढे जाऊन बोअरवेल खोदल्या आणि भूगर्भातील पाण्याची पातळी 300 ते 400 फूट खाली गेली. झाडांच्या मुलांना पाणी न मिळाल्यामुळे सगळीकडे वाळवंट निर्मिती सुरू झाली. दख्खनच्या पठारावर मोठ्या प्रमाणावर झाड तोड झाली आणि यंदाच्या उन्हाळ्यात तापमान 45 डिग्रीच्या वर गेले. याला संपूर्ण समाज जबाबदार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


वृक्ष पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी भूगर्भात साठवतात, त्यामुळे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. शेत जमिनीमध्ये शेतकरी फळफळावळ न देणाऱ्या झाडांची लागवड करत नाही. परंतु आंबा, चिंच, फणस, चिक्कू, पेरू अशा फळाचे उत्पादन देणाऱ्या झाडांची लागवड नक्की करतात. त्यामुळे नैसर्गिक जलसंधारण होते व शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक फायदा देखील मोठा होतो. ग्लोबल वॉर्मिंग विरोधात राष्ट्रीय हरित धनराई जलसंधारण क्रांतीशिवाय पर्याय नाही. एकाच वेळेला आर्थिक फायदा करून देणाऱ्या फळझाडांची लागवड करणे आणि त्याच वेळेला आपल्या परिसरामध्ये भूगर्भपातळी वाढवणे या कामाला फार मोठे महत्त्व आहे. त्यामुळे लोकभज्ञाक चळवळीने शेतकऱ्यांमध्ये याबाबत जागृती निर्माण करण्याची मोहीम सुरू केली आहे. केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांना या संदर्भात आर्थिक अनुदान देण्याची आवश्‍यकता असल्याचे ॲड. गवळी यांनी म्हंटले आहे.


आजपर्यंत शेतकऱ्यांनी बांधावरील झाडे तोडून टाकली. बांधावरुन मारामाऱ्या सुरू केल्या, भूगर्भातील पाणी बोरच्या मदतीने मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. मोठ्या प्रमाणात शेततळे भरण्याचा प्रयत्न सुरू झाला, परंतु एकंदरीत मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे वागणे हे निसर्गतंत्राशी विसंगत असल्यामुळे वाळवंट वाढत आहे आणि आपण सर्व तापमान वाढीला मदत करत आहोत. त्यामुळे लोकभज्ञाक चळवळीला सकारात्मक सहकार्य होणे गरजेचे आहे.

एकाच वेळेला शेतकऱ्यांना आर्थिक फायदा त्याच वेळेला पर्यावरणाचे प्रश्‍न सोडवण्याचा नैसर्गिक मार्ग आणि आपले शिवार वाळवंट होण्यापासून वाचविण्याचा खात्रीचा मार्ग म्हणजे राष्ट्रीय हरित धनराई जलसंधारण योजना असून, याचा स्विकार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मोहिमेसाठी ॲड. गवळी, अशोक सब्बन, ओम कदम, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *