वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संस्था संचलित मानवसेवा प्रकल्पातील निराधार माता-भगिनीं व बंधूंनी मतदानाचा हक्क बजावला. नवनागापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अरणगाव येथे संस्थेतील 15 लाभार्थ्यांनी मतदान केले. मतदानाचा हक्क बजावल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.
मानवसेवा प्रकल्पात रस्त्यावर फिरणारे निराधार माता-भगिनीं व बंधू दाखल होत असतात. त्यांना संस्थेच्या मानवसेवा प्रकल्पात मायेने सांभाळले जाते. त्यांना सर्व प्रकारच्या सोयी-सुविधा संस्था पुरवित आहे. अशा निराधारांना मतदानाचा हक्क मिळावा या उद्देशाने जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ संस्थेतील या निराधारांना ओळखपत्र मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. त्यानुसार संस्थेमधील निराधार, निराश्रित माता-भगिनीं व बंधूची मतदान नोंदणी करण्यात आली होती.
या निराधारांना मिळालेल्या मतदान कार्डने आपली ओळख मिळाली आहे. जिल्हा प्रशासन आणि श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ या संस्थेमुळे त्यांना मतदानाचा हक्क बजावता आला.