• Tue. May 14th, 2024

धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास पुस्तकांची भेट

ByMirror

Apr 27, 2024

जागतिक पुस्तक दिनाचा उपक्रम

पुस्तकांनी माणुस घडतो -चंद्रकांत पालवे

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे यांनी जागतिक पुस्तक दिनानिमित्त पुस्तकांची भेट दिली. वाचनालयाचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांच्याकडे पुस्तके सुपुर्द करण्यात आली. यावेळी साहित्यिक शब्बीर शेख, अशोक खरमाळे उपस्थित होते.


चंद्रकांत पालवे म्हणाले की, माहिती अनुभव, ज्ञान व शहाणपण पुस्तकंच देतात. पुस्तकांनी माणुस घडतो, व्यक्ती म्हणून त्याचा विकास होतो. युवा वर्ग मोबाईलमध्ये गुरफटल्याने वाचन संस्कृती लोप पावत आहे. शहरी व ग्रामीण भागात वाचन संस्कृती जोपासण्याची गरज असून, त्या दृष्टीकोनाने धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाचे सुरु असलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, सुसंस्कारीत समाज निर्मितीसाठी वाचन आवश्‍यक आहे. वाचन हा एक संवाद आहे. पुस्तकाचे वाचन केल्यास शब्दांच्या उच्चाराला धार येऊन उत्तम वक्तृत्व कौशल्य निर्माण होते. तर शब्दसंग्रह व ज्ञानात भर पडते. पुस्तक हे एक मार्गदर्शक असून, अनेक महान व्यक्तीमत्व पुस्तक वाचनातून प्रेरणा घेऊन घडले आहेत.

वाचन संस्कृती रुजविण्याबरोबरच संस्थेच्या माध्यमातून काव्य संमेलन घेऊन नवोदित कवींना प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. कवी चंद्रकांत पालवे लिखित पुस्तकांची भेट धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयास देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *