• Sat. Jul 27th, 2024

दिल्लीगेट वेस समोर या सरकारी खात्याचा होणार सुर्यसाक्षी पंचनामा

ByMirror

May 30, 2024

कृषी, जलसंधारण, रोजगारहमी, वनखाते आणि सामाजिक वनीकरण पांढरे हत्ती ठरल्याचा आरोप

निष्क्रीयतेच्या निषेध म्हणून रस्त्यावर अंडी फोडून आमलेट डिच्चू फत्ते करणार

वाजिद शेख अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण, जलसंधारण व कृषीच्या कामात पांढरे हत्ती ठरलेल्या कृषी, जलसंधारण, रोजगारहमी, वनखाते आणि सामाजिक वनीकरण या पाचही खात्यांचा दिल्लीगेट वेस समोर लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने 15 जून रोजी सुर्यसाक्षी पंचनामा केला जाणार आहे. तर या खात्यांच्या निष्क्रीयतेचा निषेध राष्ट्रीय आमलेट डिच्चू फत्तेने केला जाणार आहे. दिवसंदिवस वाढत्या तापमानात तापलेल्या रस्त्यांवर अंडी फोडून त्याचे आमलेट झाल्याचे सरकारी खात्याच्या निदर्शनास आनले जाणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.


कोरोना महामारीच्या दोन अडीच वर्षात महाराष्ट्र शासनाने ग्लोबल वॉर्मिंग विरुद्ध काही एक काम केले नाही. सरकारच्या वतीने राज्यात या काळात झाडे लावण्यात आली नाहीत. कोरोना संपल्यानंतर सुद्धा राज्यकर्त्यांनी वृक्ष लागवडीसाठी काही एक प्रयत्न केले नाही.

तर सध्या झाडे लावण्याची प्रक्रिया ही आचारसंहितेमुळे अडकली आहे. कागदोपत्री लावलेल्या झाडांचे बोगस आकडे दाखवून फक्त मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला. कृषी खात्याने शेतकऱ्यांना ठिबक धनराईबद्दल मदत केली पाहिजे, परंतु या संदर्भात काही एक योजना सरकारने पुढे आणली नाही. जलसंधारण खात्याच्या लोकांनी फक्त खोट्या बिलांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये लाटले. रोजगार हमीवर काही काम मिळत नाही, वन विभाग आणि सामाजिक वनीकरण खात्याचे अधिकारी दिवसभर वातानुकूलित ऑफिसमध्ये बसून असतात.

त्यांनी राज्यात वृक्ष लागवड होण्यासाठी काही एक मोहिम हाती घेतलेली नाही. एकंदरीत स्वातंत्र्योत्तर काळात सरकारी नोकऱ्या म्हणजे सोन्याचे अंडी देणाऱ्या कोंबड्या ठरल्या असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.


लोकभज्ञाक चळवळीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना निवेदन पाठवून, येत्या पंधरा दिवसात संपूर्ण राज्यात शेतकऱ्यांच्या माध्यमातून ठिबक धनराई होण्यासाठी त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड होण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी केली आहे. कोरोनाच्या काळानंतर खोके आणि पेट्या असा तमासा राज्यकर्त्यांनी चालू ठेवला आणि निवडणुकीमध्ये सरकारी नोकरांना वेळ नाही, असे जुजबी कारणे दाखवली. परंतु आता विधानसभेच्या निवडणुका सुरू होण्याअगोदर पाच वर्षे राज्यातील थांबलेली वृक्ष लागवड तातडीने सुरू करावी, तमाम जनतेला सरकारने या कामात सहभागी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


पाचही खात्याकडून जलसंधारण आणि मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड, ठिबक धनराईसाठी काम झाले पाहिजे, अशी मागणी संघटनेने केली आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमान एकूण 49 अंश सेल्सिअस डिग्रीपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे संपूर्ण सजीव सृष्टी आमलेट प्रमाणे भाजली जात आहे. ही बाब सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी कृषी, जलसंधारण, रोजगारहमी वन विभाग आणि सामाजिक वनीकरण या पाच खात्यांचे आमलेट दिल्लीगेट वेस समोर करण्याचे जाहीर करण्यात आले आहे. यावर्षी चांगला पाऊस होणार असल्याने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड व संवर्धन व्हावी, जलसंधारणाची कामे देखील युद्धपातळीवर केली जावे यासाठी लोकभज्ञाक चळवळ प्रयत्नशील आहे. यासाठी ॲड. कारभारी गवळी, संजय बारस्कर, अशोक सब्बन, ओम कदम, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *