• Sun. Sep 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

‘श्रीदत्त व आनंदेश्‍वर महादेव प्राणप्रतिष्ठा’ सोहळ्यानिमित्त रेल्वे स्टेशनला भक्तीमय वातावरणात रंगली मिरवणुक

ByMirror

Nov 29, 2025
विद्युत रोषणाई, ढोल-ताशांनी मिरवणुकीला रंगत

बैलगाडीतून श्रीदत्त मूर्तीची मिरवणूक; भाविकांचा ठेका व महिलांनी धरला फुगड्यांचा फेर


विद्युत रोषणाई, ढोल-ताशांनी मिरवणुकीला रंगत

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील आनंदनगर परिसरात दत्त कॉलनी येथील दत्त मंदिराच्या जिर्णोद्धारानिमित्त ‘श्रीदत्त व आनंदेश्‍वर महादेव प्राणप्रतिष्ठा’ या धार्मिक सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात मिरवणुक काढली.


हा सोहळा दत्त कॉलनी, आनंदनगर परिसरातील रहिवासी तसेच मित्रपरिवाराच्या सहकार्याने तीन दिवस भक्तिभावात संपन्न होत आहे. शुक्रवारी (दि. 28 नोव्हेंबर) संध्याकाळी श्रीदत्त मूर्तीची दिव्य मिरवणूक रेल्वे स्टेशन परिसरात रंगली होती. या मिरवणुकीत पारंपरिक पद्धतीने सजवलेल्या बैलगाडीत श्रीची मूर्ती विराजमान करण्यात आली होती.


भक्तिगीतांच्या तालावर युवकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. महिलांनी पारंपरिक पोशाखात फुगड्यांचा फेर धरला होता. मिरवणुकीभोवती मांडलेल्या छत्रींवर आकर्षक विद्युत रोषणाई सर्वांचे लक्ष वेधणारी ठरली. ढोल-ताशांच्या निनादाने संपूर्ण परिसर भक्तिमय बनला होता.


या मिरवणुकीत महिला व युवती तुलसी वृंदावन डोक्यावर घेऊन सहभागी झाल्या. तुलसी वृंदावनाची ही परंपरा भगवान दत्तात्रेयांच्या भक्तीतून रुजलेली असून, त्याला विशेष धार्मिक महत्व आहे. त्यामुळे मिरवणुकीला एक आध्यात्मिक रूप लाभले. मिरवणुकीत घोड्यावर आरूढ घोडेस्वारांनी भगवे ध्वज फडकवत दिमाखदार उपस्थिती दाखवली.


भक्तीमय वातावरणाने भारावलेली मिरवणुक पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. संपूर्ण रेल्वे स्टेशन रोड परिसरात उत्साह संचारला होता. यामध्ये भाविक महिला, मुले-मुली मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या धार्मिक सोहळ्यानिमित्त शनिवार व रविवारी प्राणप्रतिष्ठा विधी, महापूजा, कीर्तन-प्रवचन, महाप्रसाद यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामुळे आनंदनगर परिसरात उत्साह व भक्ती संचारली आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *