अवघ्या 20-21 दिवसांत शत-प्रतिशत उद्दिष्ट पूर्ण
आयुक्तांनी मानले नागरिकांचे आभार
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या वतीने राबविण्यात आलेल्या जनगणना अभियानात अहिल्यानगर महानगरपालिकेने राज्यात द्वितीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय कामगिरी नोंदविली. तब्बल 30 दिवसांसाठी नियोजित असलेले जनगणनेचे शत-प्रतिशत कार्य केवळ 20 ते 21 दिवसांत पूर्ण करून महानगरपालिकेने कार्यक्षमता, नियोजन आणि संघभावनेचा आदर्श निर्माण केला.
सुमारे 692 प्रगणक व तेवढ्याच घर याद्या आणि सुमारे 125 पर्यवेक्षकांच्या डिजिटल जनगणनेला प्रधान जनगणना अधिकारी तथा आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त आयुक्त नागेंद्र मुतकेकर, सहाय्यक आयुक्त मेहेर लहारे, जनगणना कक्ष प्रमुख राकेश कोतकर, सर्व प्रभाग अधिकारी, ब्रँड अँबेसिडर डॉ. अमोल बागुल, सर्व मास्टर ट्रेनर टेक्निकल टीम यांचे समन्वित नेतृत्व व अथक परिश्रम मोलाचे ठरले.
डांगे यांनी नमूद केले की” विशेषत: नागरिकांचा लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हे मोहिमेचे यश आहे.प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने स्वतःसाठी वेळेची उद्दिष्टे निश्चित करून शिस्तबद्ध पद्धतीने काम केल्यामुळे जनगणना मोहिमेला अपेक्षेपेक्षा अधिक वेग प्राप्त झाला.मोहिमेदरम्यान उद्भवणाऱ्या तांत्रिक अडचणी टेक्निकल टीमने तात्काळ सोडविल्या. दर चार दिवसांनी आढावा बैठका घेऊन पुढील चार दिवसांचे नियोजन, वेळापत्रक आणि आवश्यक उपाययोजना निश्चित करण्यात आल्या. त्यामुळे संपूर्ण अभियानात सातत्य, गती आणि अचूकता कायम राखण्यात यश आले.”
“जनजागृती आणि संवादावर विशेष भर देत विविध नाविन्यपूर्ण माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात आला. प्रेरणादायी गीते, माहितीपर व्हिडिओ, दैनंदिन ग्राफिक इमेजेस, आकाशवाणीवरील मुलाखती, जिंगल्स, रिंगटोन्स तसेच विविध सोशल मीडिया हँडल्सच्या माध्यमातून केवळ नागरिकांचेच नव्हे तर प्रगणक आणि पर्यवेक्षकांचेही सातत्याने प्रबोधन करण्यात आले. यामुळे जनगणना मोहिमेला व्यापक लोकसहभाग लाभला.”असे अतिरिक्त आयुक्त मुतकेकर यांनी प्रतिपादन केले.

