आरोपीशी आर्थिक हितसंबंध ठेवणाऱ्या महसुलच्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी
दंडात्मक रक्कम वसुल न केल्यास अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा ठिय्या आंदोलनाचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- वर्ष उलटून देखील पारनेर तालुक्यातील मौजी म्हसणे सुलतानपूर येथे अवैध गौण खनिज साठा केल्याप्रकरणी नोटीसद्वारे 72 लाख 45 हजार रुपयाची दंडात्मक रक्कम अद्यापि भरली गेली नसल्याने आरोपीशी आर्थिक हितसंबंध ठेवणाऱ्या महसुलच्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करुन पंधरा दिवसात सदर दंडात्मक रक्कम वसुल करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचे वतीने करण्यात आली आहे. अन्यथा श्रीगोंदा-पारनेर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालना समोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी दिला आहे.
मौजी म्हसणे सुलतानपूर येथील गट नंबर 39 मध्ये अनाधिकृत रित्या गौण खनिज साठा केल्याने दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी दत्तात्रय शिवाजी दिवटे व इतर तीन व्यक्तींना नोटीस बजावण्यात आली होती. पारनेर तहसील कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी यांनी आर्थिक हितसंबंध जोपासत नोटीस बजावण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई केली होती. शासनाचा महसूल बुडवत दंडात्मक रक्कम शासन दरबारी भरण्यास शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी कर्तव्यात कसूर केला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. समोरच्या व्यक्तींनी नोटीसाला उत्तर देखील दिलेले नाही. खुलासा करण्याची मुदत संपून गेली असून, सदरची रक्कम ही त्या सामायिक क्षेत्रातील सर्व नोंदी धारकावर बोजा चढविण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सदरच्या गट नंबर 39 मध्ये पारनेर दुय्यम निबंधक यांच्याशी आर्थिक हितसंबंध जोपासत शेती गट खरेदी करण्यात येऊन, त्या गटात अधिकृतरित्या बांधकामाची कुठलीही परवानगी न घेता लेआउट न टाकता प्लॉटिंग व्यवसाय सुरू करण्यात आला आहे. त्यामध्ये दहा जण मिळून दहा गुंठे सामायिक क्षेत्र खरेदी दस्त दुय्यम निबंधक यांच्याशी संगमत करून खरेदी दाखवण्यात आली. वस्तुस्थिती आज ज्या ठिकाणी शेती प्लॉट नसून, काही प्लॉट धारकांनी कुठलीही परवानगी न घेता दोन ते तीन मजली इमारत उभी केली आहे. शासनाची दिशाभूल करून मोठी स्टॅम्प ड्युटी रकमेचा अपहार करून व महसूल बुडवून अधिकाऱ्यांना हाताशी धरण्यात आले असल्याचे म्हंटले आहे.
19 जून 2023 ची तहसील कार्यालय यांच्या नोटीस प्रमाणे 14 महिने विलंब झालेला असून, या नोटिसाच्या आदेशाप्रमाणे गट नंबर 39 मधील दत्तात्रय दिवटे व इतर तीन जण यांच्या स्थावर मालमत्तेवर बोजा चढवण्यात येऊन दंडाच्या रकमेची वसुली 15 दिवसाच्या आत करावी, गौण खनिज दंडात्मक नोटीस बाजवण्यास विलंब केल्याप्रकरणी दोषी असणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी होऊन त्यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्यानुसार शिस्तभंगाची कारवाई व्हावी, सामायिक क्षेत्र खरेदी खताची चौकशी करून क्षेत्र शेतीसाठी वापरण्यात येते की प्लॉटिंगसाठी याबाबत स्वतः स्पॉट पंचनामा करून नियमबाह्य खरेदी खत रद्द करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय व श्रीगोंदा-पारनेर उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.