• Thu. Dec 12th, 2024

रिपाईच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी घेतली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. आठवले यांची भेट

ByMirror

Aug 26, 2024

दक्षिण जिल्हाध्यक्षपदी संजय भैलुमे कायम असल्याबाबत आठवलेंकडून शिक्कमोर्तब झाल्याचा दावा

वरिष्ठ नेते जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करत असल्याचा आरोप

अहमदनगर (प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री ना. रामदास आठवले यांची मुंबईत भेट घेतली. गेल्या आठवड्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची शहरात बैठक घेऊन राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हा संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव आणि राज्य उपाध्यक्ष विजय वाकचौरे यांनी जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करुन प्रभारी निवड केल्याचे जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.


पक्ष कार्यालयात ना. आठवले यांच्याशी झालेल्या भेटप्रसंगी रिपाईचे जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे, जिल्हा कार्याध्यक्ष विलास साठे, माजी शहर जिल्हाध्यक्ष नाना पाटोळे, युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे, पारनेर तालुकाध्यक्ष राजेंद्र उबाळे, कर्जत तालुकाध्यक्ष नागेश घोडके, कर्जत आयटी सेल तालुकाध्यक्ष रमेश आखाडे, जामखेड तालुकाध्यक्ष प्रमोद सदाफुले, भिंगार शहराध्यक्ष मंगेश मोकळ, युवक जिल्हा सचिव गौतम कांबळे, युवक जिल्हा सरचिटणीस दया गयभिये आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


उपस्थित पदाधिकाऱ्यांनी ना. आठवले यांना जिल्ह्याचा व लोकसभा निवडणुकीचा अहवाल सविस्तर सादर केला. त्यामध्ये संजय भैलुमे यांची जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. यावर ना. आठवले यांनी संजय भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सर्व कार्यकारिणी कायम असून, सुनिल साळवे यांची विधानसभा निवडणुकीच्या जिल्हा प्रभारीपदी निवड करण्यात आली असल्याचे स्पष्ट केले. रिपाईचे दक्षिण जिल्हाध्यक्ष म्हणून संजय भैलुमे हेच असल्याचे शिक्कामोर्तब ना. आठवले यांनी केला असल्याचा दावा भेटीसाठी गेलेल्या शिष्टमंडळाने केला आहे.


पक्षाची सभासद नोंदणी सुरु आहे. ज्या कार्यकर्त्यांनी सभासद नोंदणी केलेली नाही, त्यांनी सभासद नोंदणी करावी. नोंदणी केल्याशिवाय त्यांना पक्षाचे सक्रिय सभासद होता येणार नसल्याचेही ना. आठवले यांनी स्पष्ट केले. शिष्टमंडळातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अहमदनगर जिल्ह्यासाठी दक्षिण व उत्तरसाठी वेगवेगळे दोन संपर्कप्रमुख देण्याची जोरदार मागणी केली. या मागणीला ना. आठवले यांनी अनुकुलता दर्शवली असल्याचेही शिष्टमंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.


वरिष्ठ नेते जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची दिशाभूल करत असून, कार्यकर्त्यांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये. विधानसभेच्या तोंडावर रिपब्लिकन पक्ष बळकट करण्यासाठी जिद्दीने कामाला लागण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *