ज्ञानसरीता पुरस्काराने सन्मानित
अहमदनगर (प्रतिनिधी)- युवा बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेतील पूर्व प्राथमिक विभागाच्या शिक्षिका साधना प्रसाद कुकडे -कुलकर्णी यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला. कुकाणा (ता. नेवासा) येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना श्रीराम साधना आश्रमचे महंत सुनिलगिरी महाराज यांच्या हस्ते ज्ञानसरीता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी जेष्ठ साहित्यिक कवी सुभाष सोनवणे, प्रतिष्ठानचे सचिव सुनिल पंडीत, उपाध्यक्ष प्रा. डॉ.सतोष तागडे, चंद्रकांत कांबळे आदी उपस्थित होते.
स्व. यादवराव यशवंत कांबळे यांच्या स्मरणार्थ संस्थेच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला जिल्हाभरातून प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्या साधना कुकडे -कुलकर्णी यांना स्मृतीचिन्ह, रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. साधना कुकडे यांनी मिळवलेल्या यशाबद्दल प्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापिका गुफेकर, सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.