मेहेर इंग्लिश स्कूल, श्री नवनाथ युवा मंडळ, डोंगरे बहुउद्देशीय संस्था व साईश्रध्दा फाऊंडेशनचा उपक्रम
स्वच्छतेसाठी आठवड्यातून 2 तास श्रमदान करण्याची विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
अहमदनगर (प्रतिनिधी)- हिंद सेवा मंडळाचे मेहेर इंग्लिश स्कूल, श्री नवनाथ युवा मंडळ, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था व साईश्रध्दा फाऊंडेशनच्या वतीने पटर्वर्धन चौक येथील मेहेर इंग्लिश स्कूलच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जिल्हा क्रीडा कार्यालय व नेहरु युवा केंद्राच्या निर्देशानुसार माय भारत अतंर्गत स्वच्छता ही सेवा उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसह स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. तर शालेय विद्यार्थ्यांना सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व सांगून, घाण करणार नाही व दुसऱ्यालाही घाण करुन देणार नाही आणि आठवड्यातून 2 तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याची शपथ देण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी मेहेर इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या अनुरिता झगडे, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, आशा घोरपडे, साईश्रध्दा फाऊंडेशनच्या अध्यक्षा अर्चना परकाळे, गीता वल्लकट्टी, मोनिका बमदाळे, युवा मंडळाच्या अध्यक्षा पै. संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे-खोडदे, शितल दळवी, समीना शेख आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, अस्वच्छतेमुळे शहरातील नागरिकांना साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे. शहरात मोठ्या प्रमाणात डेंग्यू, चिकनगुन्या आदी साथीचे आजार पसरले आहे. या आजारांना रोखण्यासाठी स्वच्छता आवश्यक आहे. अस्वच्छतेमुळे डासांची उत्पत्ती होवून साथीच्या आजारांचा फैलाव होत असून, सार्वजनिक स्वच्छतेसाठी नागरिकांनी कर्तव्य म्हणून हातभार लावण्याचे त्यांनी आवाहन केले.
प्राचार्या अनुरिता झगडे म्हणाल्या की, निरोगी भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शहर स्वच्छ होणे गरजेचे आहे. सार्वजनिक परिसर स्वच्छ झाल्यास रोगराई कमी होण्यास मदत होणार आहे. सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे. भविष्यात स्वच्छतेवर निरोगी आरोग्य टिकून राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमातंर्गत विद्यार्थ्यांचा अस्वच्छतेमुळे पसरणारी रोगराईची माहिती देऊन स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले. हातात झाडू विद्यार्थ्यांसह शिक्षिका, सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधींनी शालेय परिसराची स्वच्छता केली. या स्वच्छता अभियानासाठी नेहरु युवा केंद्राचे राज्य संचालक शिवाजी खरात, सिद्धार्थ चव्हाण, रमेश गाडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, क्रीडा अधिकारी भाऊराव वीर, राज्य क्रीडा मार्गदर्शक ज्ञानेश्वर खुरांगे, विशाल गर्जे, सुनील धारुडकर यांचे मार्गदर्शन लाभले.