विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या त्या अधिकाऱ्यांचे निलंबन व्हावे
अहमदनगर (प्रतिनिधी)- विनयभंगाचा गुन्हा दाखल झालेल्या प्राथमिकचे शिक्षणाधिकारी व जिल्हा सहाय्यक कक्ष अधिकारी यांच्यावर त्वरित निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) ओबीसी सेलच्या वतीने जिल्हा परिषदेत बुधवारी (दि.24 एप्रिल) उपोषण करण्यात आले. या उपोषणात ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, संदीप वाघचौरे, हर्षल जाधव, विकास पटेकर, आदील शेख, अजय बडोदे, अरुण अब्राहम आदी सहभागी झाले होते.
जिल्हा परिषद प्राथमिकचे शिक्षणाधिकारी व जिल्हा सहाय्यक कक्ष अधिकारी यांच्यावर 10 एप्रिल रोजी पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. सदर गुन्हा गंभीर असून, वरील व्यक्तींना निलंबित केले गेले नाही. कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल झाला असता जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही, तोपर्यंत निलंबन करणे बंधनकारक असते.
मात्र या प्रकरणातील अधिकाऱ्यांचे निलंबन केले गेले नसल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणने आहे.
गुन्हा दाखल होवूनही सदरील व्यक्ती आपल्या पदावर हजर झाले आहेत. या व्यक्तीचे तातडीने निलंबन करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ओबीसी सेलच्या वतीने करण्यात आली आहे.