पर्यावरण संवर्धनासाठी जय हिंदने उभी केलेली लोकचळवळ खरी देशभक्ती -बालाजी घुगे
अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनासाठी जय हिंद फाउंडेशनने वृक्षारोपण व संवर्धनाची उभी केलेली लोकचळवळ खरी देशभक्ती आहे. जिल्ह्यातील डोंगररांगा, टेकड्या व ओसाड परिसर हिरवाईने फुलविण्यासाठी फाऊंडेशनच्या माध्यमातून माजी सैनिकांनी दिलेले योगदान अभिमानास्पद असून, वृक्षरोपणाने पर्यावरण संवर्धन होणार असून, यामध्ये सर्वांचे हित समावलेले असल्याचे प्रतिपादन बालाजी घुगे यांनी केले.
वृक्षरोपणाने पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देणाऱ्या जय हिंद फाउंडेशनच्या वतीने चिचोंडी (ता. पाथर्डी) येथील एमआयटी महाविद्यालय परिसरात 201 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. संस्थेच्या संचालिका प्रा. स्वातीताई कराड-चाटे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी चिचोंडी गावचे सरपंच श्रीकांत आटकर, डमाळवाडीचे माजी सरपंच रामनाथ शिरसाठ, धारवाडी गावचे माजी सरपंच बापू गोरे, लोहसरचे उपसरपंच डॉ. गोरक्ष गिते, प्राचार्य बालाजी घुगे, रमेश कामुनी, अक्षय आहेर, गणेश निकम, अमोल मांडवकर, जयश्री चक्रनारायण, दिपाली आव्हाड, जयश्री जराड, वैशाली थोरात, शुभांगी दिवटे, तनुजा मॅडम, सतीश सर, शुभम शिंदे, रामेश्वर झाडगे, जय हिंदचे शिवाजी पालवे, बबन पालवे, आदिनाथ पालवे, गोरक्षनाथ गीते, अंबादास आव्हाड, आकाश टाकरस, बंडू आव्हाड, सचिन आव्हाड आदी उपस्थित होते.
सरपंच श्रीकांत आटकर म्हणाले की, जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले जात आहे. पर्यावरण संवर्धनासाठी ही मोहिम दिशादर्शक ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाजी पालवे यांनी विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे, तर झाडांमुळे उद्याचे भवितव्य ठरणार आहे. निसर्गाचे समतोल बिघडल्याने अनेक नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे.
भविष्यातील संकटे टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
एमआयटी महाविद्यालय परिसरात लावण्यात आलेल्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्विकारली. यावेळी आंबा, जांभळ, चिंच, आवळा, सिताफळ अशा विविध प्रकारची फळझाडे लावण्यात आली. प्रत्येक विद्यार्थ्यांनी या पावसाळ्यात एक वृक्ष लावून त्याचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले. आभार माजी सैनिक बबन पालवे यांनी मानले.