• Tue. Sep 10th, 2024

मद्यधुंद पोलीस उपनिरीक्षकाकडून शहरात वृत्तपत्र छायाचित्रकारास मारहाण

ByMirror

Sep 5, 2024

त्या पोलीस उपनिरीक्षकाच्या निलंबनाची मागणी; पत्रकारांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- रात्री मद्यधुंद अवस्थेत वृत्तपत्र छायाचित्रकार तथा स्थानिक वृत्त वाहिनीचे प्रतिनिधी अजहर सय्यद यांना मारहाण केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे यांच्या निलंबनाच्या मागणीसाठी शहरातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व वृत्तपत्रांचे पत्रकार, वृत्त वाहिन्यांचे प्रतिनिधी व वृत्त छायाचित्रकार यांनी या घटनेचा निषेध नोंदविला.


अजहर सय्यद हे वृत्त छायाचित्रकार व एका स्थानिक वृत्त वाहिनीचे प्रतिनिधी म्हणून शहरात काम करत आहे. मंगळवारी (दि.3 सप्टेंबर) रात्री 12 वाजल्याच्या दरम्यान सय्यद हे जुने बस स्थानक येथे उभे असताना, पोलीस उपनिरीक्षक महेश शिंदे पोलीस वाहनात चालकासह आले होते.


वाहनातून उतरल्यानंतर त्यांनी तेथे असलेल्या इतर व्यक्तींना शिवीगाळ करुन धिंगाणा घालण्यास सुरुवात केली. सय्यद यांच्याकडे येऊन त्यांनाही शिवीगाळ केल्यानंतर त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात काम करत असल्याची ओळख सांगितली. मात्र महेश शिंदे मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्यांनी काहीही ऐकून न घेता अरेरावीची भाषा करत मारहाण करण्यास सुरुवात केल्याचा आरोप करण्यात आला आहे.


मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शिंदे यांना काय करतोय व काय बोलतोय? याचे देखील भान नव्हते. जे दिसेल त्यांना मारण्याचा सपाटा त्यांनी सुरु केल्याने संपूर्ण बसस्थानक परिसरात त्यांच्या हैदोसामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. अशा काही पोलीसांमुळे संपूर्ण पोलीस दलाची बदनामी होत आहे. दारु पिऊन ड्युटीवर येणे व सर्वसामान्य नागरिकांमध्ये दशहत पसरविणे हे पोलीस खात्याला बदनामीकारक व निषेधार्ह बाब असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. मद्यधुंद पोलीस अधिकारीचे तात्काळ निलंबन करुन त्यांची बदली करण्याची मागणी पत्रकारांच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *