तथागत बुद्धिस्ट सोसायटीचा उपक्रम; शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
आर्थिक दुर्बल घटकांना आधार देण्यासाठी तथागत बुद्धिस्ट सोसायटीचा पुढाकार -संजय कांबळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात वाढत्या साथीच्या आजारांमुळे सर्वसामान्य वर्गाला आधार देण्याच्या दृष्टीकोनाने तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या वतीने रेल्वे स्टेशन भागातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबविण्यात आले. तर महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन विद्यार्थी व नागरिकांना साथीचे आजार टाळण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
तथागत बुद्धिस्ट सोसायटीचे अध्यक्ष संजय कांबळे, डॉ. विश्वास गायकवाड, डॉ. हमेद बेग, लॅब टेक्निशियन शुभम पाडोळे, मुध्याध्यापक विजय घिगे, शिक्षिका भारती कवडे, मनिषा शिंदे, मनिषा गिरमकर, दिपाली नवले, मेघना वाडगे, अश्पाक शेख, सिध्दांत कांबळे आदी उपस्थित होते.
संजय कांबळे म्हणाले की, पावसाळ्यात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेकडून पुरेश्या प्रमाणात उपाययोजना झाली नसल्याने साथीचे आजार रेल्वे स्टेशन भागात झपाट्याने पसरले आहे. प्रत्येक घरात एक रुग्ण आढळत असून, शालेय विद्यार्थी देखील मोठ्या प्रमाणात आजारी पडले आहेत. या परिसरातील नागरिक आर्थिक दुर्बल घटक असल्याने त्यांना उपचाराचा खर्च पेलवत नाही. परिणामी मोठ्या दवाखान्यात जाण्याची त्यांची आर्थिक कुवत नाही. त्यांना आधार देण्यासाठी तथागत बुद्धिस्ट सोसायटीने त्यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या उपक्रमात स्वातंत्र्य दिन व रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या शिबिरात रेल्वे स्टेशन भागातील दोनशेपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. तर सर्व शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन गरजूंवर औषधोपचार करण्यात आले. या शिबिरात मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड, लिपिड प्रोफाइल, गुडघेदुखी, कंबरदुखी, अंगदुखी, सर्दी खोकला, ताप, डेंगू, गोचीड ताप, टायफाईडची तपासणी मोफत करण्यात आली.