अल करम व युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्टचा स्वातंत्र्य दिनाचा उपक्रम
युवकांनी देशभक्तीने प्रेरित होऊन राजकारण व समाजकारण ओळखण्याची गरज -महेबुब शेख
अहमदनगर (प्रतिनिधी)- अल करम सोशल इन एज्युकेशन सोसायटी व युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्टच्या (डेंटल केयर) वतीने नागरिकांची मोफत दंत तपासणी करुन रक्तदान शिबिर घेण्यात आले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना रक्तदानाचे महत्त्व सांगून दंत विकार टाळण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
भुईकोट किल्ला येथे घेण्यात आलेल्या दंत रोग तपासणी शिबिराला नागरिकांसह आबाल वृध्दांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. तर रामचंद्र खुंट येथील महेश मंगल कार्यालयात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात युवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी युनिव्हर्सल एज्युकेशन ट्रस्टचे व्हाईस चेअरमन महेबुब शेख, डॉ. स्वालेहा बागवान, डॉ. वैष्णवी गोरे, डॉ. सायली शिंदे, डॉ. सावंत पालवे, दीपा, मास्टर मुस्तफा शेख, डॉ. प्रियंका पाटील, आलिम शेख, अफसर शेख, बाळासाहेब बोराटे, डॉ. जहीर मुजावर, तौफिक तांबोळी, शाहिद काझी, अर्शद सय्यद, समीर सय्यद, राजिक खान आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महेबुब शेख म्हणाले की, सामाजिक सेवा हीच खरी देशभक्ती आजच्या युवकांमध्ये रुजविण्याची गरज आहे. राजकीय पोळी भाजण्यासाठी युवकांचे माथी भडकविण्याचे प्रकार सुरु असून, युवकांनी देशभक्तीने प्रेरित होऊन राजकारण व समाजकारण ओळखण्याची गरज आहे. रक्तदान देखील माणुसकी शिकवीत असून, गरजेच्या वेळी ते रक्त कोणत्या जाती- धर्माचे आहे? हा मुद्दा गौण असतो. कोरोनात जागृत झालेली माणुसकी पुन्हा जातीय रंगात ढवळून निघत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. स्वालेहा बागवान म्हणाल्या की, फास्टफुडच्या युगात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यन्त लहान मुलांमध्ये दातांचे विकार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. योग्यवेळी मार्गदर्शन व उपचार न मिळाल्यास ते दात गमवण्याची वेळ येते. दातांचे विकार निर्माण झाल्यास मोठ्या वेदना सहन कराव्या लागतात, यासाठी वेळोवेळी काळजी घेण्याचे त्यांनी आवाहन केले. या शिबिरात दंत तपासणी करुन गरजूंना मोफत उपचार देखील करण्यात आली. पुढील उपचारासाठी विशेष सवलत देखील देण्यात आली. तर रक्तदान केलेल्या युवकांचा सन्मान करण्यात आला.