रस्त्यावरील अतिक्रमण व बेकायदेशीर बांधकाम विरोधात स्थानिक नागरिकाची तक्रार
ते अतिक्रमण व बेकायदेशीर भाडेकरु नागरिकांसाठी ठरत आहे डोकेदुखी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराच्या कायनेटीक चौक येथील रवीश व सारस रो हाऊसिंग मधील रस्त्यावरील अतिक्रमण व बेकायदेशीर बांधकाम हटविण्याची तक्रार स्थानिक नागरिकांच्या वतीने सतीश सायंबर यांनी महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले असून, अनेकांनी केलेले बेकायदेशीर बांधकाम व त्यामध्ये राहत असलेले भाडेकरु स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रवीश व सारस रो हाऊसिंग गट नंबर 30 येथील जागेत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रित्या बांधकाम करून तेथे रस्त्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. रस्त्यावर झालेले अतिक्रमण वाहतुकीस अडथळा ठरत आहे. बेकायदेशीर बांधकाम व रस्त्यावरील अतिक्रमणामुळे स्थानिक परिसरातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बेकायदेशीर बांधकाम करुन त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भाडेकरु वास्तव्यास आहे. कोणतेही परवानगी न घेता, बेकायदेशीर भाडेकरु ठेवण्यात आल्याने महापालिकेचा महसुल देखील मोठ्या प्रमाणात बुडवला जात आहे. भाडेकरुंच्या उपद्रवामुळे स्थानिक नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ड्रेनेज लाईनवर पक्के बांधकाम करण्यात आले असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या परिसरात एखादी मोठी दुर्घटना किंवा गंभीर परिस्थिती ओढवल्यास अग्निशमक दलाचे बंब व रुग्णवाहिका देखील जाऊ शकत नाही. सदरील अतिक्रमण व बेकायदेशीर बांधकाम नागरिकांसाठी धोकादायक बनत चालले आहे. जवळच सिना नदीचे पात्र असल्याने नदीला पूर परिस्थिती निर्माण झाल्यास गंभीर धोका उद्भवू शकतो, असे निवेदनात म्हंटले आहे. याप्रकरणी तातडीने चौकशी करुन स्त्यावरील अतिक्रमण व बेकायदेशीर बांधकाम हटवावे आणि बेकायदेशीर भाडेकरु ठेवणाऱ्यांकडून कर वसुलीसाठी दंडात्मक कारवाई करण्याची मागणी सतीश सायंबर यांनी केली आहे.