• Wed. Dec 11th, 2024

केडगावला रंगलेल्या साई सच्चरित्र ग्रंथ पारायण सोहळ्याची सांगता

ByMirror

Aug 25, 2024

भारतीय संस्कृतीने देवाचे स्वरुप निसर्गाशी जोडले -सचिन कोतकर

शाहूनगर परिसरातून निघालेल्या पालखी मिरवणूकीने वेधले लक्ष

अहमदनगर (प्रतिनिधी)- ज्या धार्मिक कार्याने मानसिक समाधान मिळते, तिथे देवाचे अस्तित्व नक्कीच असते. नोकरी, व्यवसायानिमित्त आपण गाव सोडून इतरत्र स्थायिक होतो. अशा नवीन ठिकाणी मंदिराची उभारणी करून आपण पुन्हा एकत्र येण्याचा आनंद लुटतो. भारतीय संस्कृतीने देवाचे स्वरुप निसर्गाशी जोडले असून, अध्यात्माने मन प्रफुल्लित होते व नकारात्मकता नष्ट होत असल्याचे प्रतिपादन उद्योजक सचिन कोतकर यांनी केले.


श्री साईबाबा फाऊंडेशनच्या वतीने केडगाव येथील बँक कॉलनीतील साईबाबा मंदिराच्या अकरावा स्थापना दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या साई सच्चरित्र ग्रंथ पारायण सोहळ्याच्या समारोपप्रसंगी कोतकर बोलत होते. या सोहळ्याची सांगता काल्याच्या किर्तनाने दहीहंडी फोडून करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. यावेळी फाऊंडेशनचे सदस्य डॉ. मुकुंद शेवंगावकर, प्रकाश वाघ, अशोक झिने, अजितसिंग दडियाल, विजय गोरे, शिवाजी वाकचौरे, अशोक जाधव, कावेरी जाधव, श्रीनिवास सहदेव, सुनिल कोतकर,भुषण गुंड, जयद्रथ खाकाळ, दडियाल भाभी ,प्रकाश चांदेकर, दत्तात्रय टेके, राजू हजारे, चव्हाण, संजय बोरगे, टेके गुरुजी, गायकवाड, योगेश गुंजाळ, रविंद्र देशपांडे, पुरुषोत्तम भूकन, हर्षदा कांडेकर आदींसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे सचिन कोतकर म्हणाले की, केडगाव मधील रस्त्याची खूप खराब अवस्था झाली आहे. वृद्ध महिलांना व पुरुषांना मणक्याचे त्रास होत आहे. हॉस्पिटलमध्ये गर्दी वाढली आहे. ही सर्व परिस्थिती बदलायची असेल, तर निवडणूक आल्यावर आपले मागचे काम झाले की नाही? हे पाहिले पाहिजे. जनतेने मनात आनले तर ते बदल घडवू शकते. काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना मतदान करण्याचे त्यांनी सांगितले. तर श्रावण महिन्यात सर्व महत्त्वाचे सण उत्सव असतात. समाजात धार्मिक वातावरण निर्माण झालेले आहे. या धार्मिक सोहळ्याने सर्वांना आत्मिक आनंद मिळत असल्याचे स्पष्ट केले.


साई सच्चरित्र ग्रंथ पारायण सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. या सोहळ्यास केडगावकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वरूनदेवांन सुद्धा कार्यक्रमास हजेरी लावली होती. प्रारंभी शाहूनगर परिसरातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. साई बाबांच्या पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. साईभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. काकड आरती दिलीपशेठ नागरे यांच्या हस्ते तर सकाळची आरती आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ यांच्या हस्ते झाली. साईकथाकार माधुरीताई शिंदे यांच्या प्रवचनाने भाविक मंत्रमुग्ध झाले. साई सच्चरित्र ग्रंथ पारायण समारोपप्रसंगी साईंची धुपारती बाळासाहेब सातपुते यांच्या हस्ते झाली. या सोहळ्याची सांगता सचिन कोतकर यांच्या हस्ते आरती व महाप्रसादाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक झिने यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *