• Thu. Dec 12th, 2024

निमगाव वाघात बालविवाह मुक्त अभियान राबवून महात्मा फुले यांचा स्मृतीदिन साजरा

ByMirror

Nov 30, 2024

विद्यार्थ्यांमध्ये बालविवाहच्या दुष्परिणामाची जागृती

मुलींच्या लग्नाची घाई न करता पालकांनी त्यांना भवितव्य घडविण्यासाठी प्रोत्साहन द्यावे -पै. नाना डोंगरे

नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, नेहरु युवा केंद्र, जिल्हा क्रीडा कार्यालय, स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ, नवनाथ विद्यालय, धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालय व साई श्रध्दा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा ज्योतिबा फुले यांचा 134 वा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. नवनाथ विद्यालयात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन बालविवाह मुक्त भारत मोहिमेतंर्गत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्यात आली.


याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे, बाळासाहेब कोतकर, प्रमोद थिटे, अमोल वाबळे, तेजस केदारी, मयुरी जाधव, भानुदास लंगोटे, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, प्रतिभा डोंगरे-खोडदे, तृप्ती वाघमारे, अर्चना परकाळे, प्रियंका डोंगरे-ठाणगे आदींसह शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पै. नाना डोंगरे म्हणाले की, शिक्षणाचा पाया रोवून महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाला सुसंस्कारी केले. महिलांपासून शिक्षणाची सुरुवात करून, त्यांनी महाराष्ट्राच्या मातीत क्रांती घडविली. कुटुंबात महिला साक्षर झाल्यास त्या कुटुंबाची प्रगतीपथाकडे वाटचाल असते, पालकांनी मुलींच्या लग्नाची घाई न करता त्यांना शिक्षणाने आपले भवितव्य घडविण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे त्यांनी आवाहन केले.


उत्तम कांडेकर म्हणाले की, बालविवाहामुळे मुला-मुलींचे भविष्य धोक्यात येते. आपले भवितव्य घडविण्याच्या वयात त्यांच्यावर जबाबदाऱ्या येतात. तर मुलींना लहान वयात आई होणे जीवावर बेतते. यासाठी पालकांनी जागृक राहून मुलीच्या वयाच्या 18 वर्षानंतर लग्न करावे. तर आपल्या मैत्रीणींचे कमी वयात लग्न होत असल्यास उडान प्रकल्पाला माहिती देण्याचे आवाहन केले.


या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना अल्पवयीन वयात होणाऱ्या लग्नाचे दुष्परिणाम सांगून, बालविवाह प्रतिबंधक शपथ देण्यात आली. या उपक्रमासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एन.बी. कराळे, शिक्षणाधिकारी (योजना) बाळासाहेब बुगे, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी संकल्प शुक्ला, जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अशोक गाडेकर, नेहरु युवा केंद्राचे लेखापाल सिध्दार्थ चव्हाण, रमेश गाडगे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *