आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची मोफत हृदयरोग तपासणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- जात, धर्म, पंथ पलीकडे जाऊन आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्यसेवेतून माणुसकी धर्म जपला जात आहे. येणाऱ्या रुग्णांकडे माणुसकीच्या भावनेने पाहून त्याच्या जीवनातील वेदना दूर करण्याचे काम हे आरोग्य मंदिर करत आहे. गरजू घटकांना उपचाराच्या सुविधा उपलब्ध करुन त्यांना नवजीवन दिले जात असून, निस्वार्थ रुग्णसेवेतून आनंदऋषीजी हॉस्पिटल मानवतेचे प्रतिक बनले बनले असल्याचे प्रतिपादन उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते आरिफ रफिक शेख यांनी केले.
जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आचार्य श्री आनंदऋषीजी महाराज यांच्या 124 व्या जयंतीनिमित्त आरिफ रफिक शेख व शेख परिवाराच्या वतीने आयोजित मोफत ह्रद्यरोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी शेख बोलत होते. यावेळी डॉ. वसंत कटारिया, संतोष बोथरा, सतीश (बाबूशेठ) लोढा, मानकचंद कटारिया, वसंत चोपडा, प्रकाश छल्लाणी, डॉ. वसंत कटारिया, डॉ. राहुल अग्रवाल, डॉ. अनिकेत कटारिया, डॉ. विनय छल्लाणी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ. वसंत कटारिया म्हणाले की, हॉस्पिटलमध्ये असलेला अद्यावत कार्डियाक विभाग आरोग्यसेवेचा आधार असून, कॅथलॅब देशातील सर्वोत्कृष्ट कॅथलॅब म्हणून नावरुपास आली आहे. कार्डियाक विभागात लहान मुलांपासून वयोवृध्दां पर्यंतच्या हृदयाच्या सर्व शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केल्या जात आहे. हॉस्पिटलमध्ये अद्याप पर्यंत 50 हजारपेक्षा जास्त बायपास सर्जरी, 70 हजारपेक्षा अधिक एन्जोप्लास्टी व एक लाखापेक्षा अधिक अँजिओग्राफी करण्यात आलेली आहे. तसेच 6 हजार लहान बालकांच्या ह्रद्यरोग संबंधी यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. बायपास सर्जरी ही अत्यंत अवघड शस्त्रक्रिया यशस्वी केल्या जात आहे. महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत या शस्त्रक्रिया मोफत होत असल्या तरी त्याचा दर्जा सर्वोत्तम ठेवण्याचे काम तज्ञ डॉक्टर करत असल्याचे त्यांनी सांगितले.
पाहुण्यांचे स्वागत प्रकाश छल्लाणी यांनी करुन आरिफ रफिक शेख दरवर्षी आरोग्य सेवेच्या कार्यात योगदान देत असल्याचे सांगून त्यांच्या सेवा कार्याचे कौतुक केले. शेख यांनी हॉस्पिटलसाठी मदतीचा धनादेश विश्वस्तांकडे सुपुर्द केला.
या शिबिरात 160 रुग्णांची मोफत हृदय तपासणी करण्यात आली. तर शिबिरात सहभागी गरजूंची 3 हजार रुपयात अँजिओग्राफी करण्यात आली. गरजेनुसार रुग्णांची बायपास सर्जरी, हृदयातील झडप बदलणे, हृदयातील छिद्र बुजविणे, लहान मुलांच्या हृदय शस्त्रक्रिया, अँजिओप्लास्टी, अँजिओग्राफी अल्पदरात केल्या जाणार आहेत. तर महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत या शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन डॉ. आशिष भंडारी यांनी आभार मानले.