युवा सेनेचे शहर प्रमुख पै. महेश लोंढे यांचे महिलांनी मानले आभार
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणींचा मान-सन्मान वाढविला -पै. महेश लोंढे
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड येथील महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये खात्यात जमा झाल्याने आनंदोत्सव साजरा केला. तर या योजनेत नाव समाविष्ट होण्यासाठी युवा सेनेचे शहर प्रमुख पै. महेश लोंढे यांनी बहिणींना भावाप्रमाणे सहकार्य केल्याबद्दल रक्षाबंधनानिमित्त त्यांना महिलांनी राखी बांधून ओवाळणी केली.
राज्य सरकारने 28 जून रोजी जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी 21 ते 65 वयोगटातील महिलांना 31 ऑगस्ट पर्यन्त अर्ज भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सर्वच महिलांची धावपळ उडाली असताना युवा सेनेचे शहर प्रमुख पै. महेश लोंढे यांनी नगर-कल्याण रोड येथे स्वखर्चाने सायबर सेंटर महिलांसाठी निशुल्क उपलब्ध करुन दिले. महिलांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करुन त्यांचे अर्ज भरुन घेण्यात आले. यामुळे अनेक महिलांना सहजरित्या अर्ज भरुन या योजनेचा लाभ घेता आल्याबद्दल महिलांनी त्यांचे विशेष आभार मानले.
पै. महेश लोंढे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांचा मान-सन्मान वाढविला असून, त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी धोरणात्मक पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री यांनी रक्षाबंधनानिमित्त राज्यातील बहिणींना या योजनेद्वारे ओवाळणी दिली असून, शिवसेनेच्या माध्यमातून राज्यात अनेक कल्याणकारी योजना राबविण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांचे अर्ज भरण्यासाठी वैभव वाघमारे यांनी विशेष सहकार्य केले.