कला क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनाहत एक कलासृष्टी करणार सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- पुनीत बालन ग्रुप सादर तालचक्र (पुणे) व अनाहत एक कलासृष्टी (अ. नगर) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात 31 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता नंदनवन लॉन्स, न्यू टिळक रोड येथे नगरच्या मातीत जन्मलेल्या स्वरचित गीत रचनांचे सादरीकरण नवनगरी सूर आणि पं. विजयजी घाटे यांच्या संकल्पनेतून तयार झालेला कार्यक्रम ताल दिंडी सादर होणार आहे. या कार्यक्रमात कला क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते नाट्य अभिनेते प्रसाद बेडेकर व बाल कलाकार आरुष बेडेकर यांचा अनाहत संस्थेतर्फे गौरव केला जाणार आहे.
शहरातील सांस्कृतिक ठेवा जपण्याचे काम अनाहत करत आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमातून श्रोत्यांना एक वेगळी पर्वणी मिळणार आहे. या माध्यमातून कलाकारांना एक व्यासपीठ व श्रोत्यांना चांगल्या कार्यक्रमाची उपलब्धी होणार आहे. याच आपल्या नगरचे भूषण असलेले नाट्य अभिनेते तथा प्रसिद्ध निवेदक प्रसाद बेडेकर आणि बाल शंकर महाराज या भूमिकेने रसिकप्रिय झालेला आरुष बेडेकर यांचा सन्मान होणार आहे.
प्रसाद बेडेकर हे गेल्या 22 वर्षापासून रंगभूमीवर कार्यरत असून त्यांनी अभिनयाच्या आणि निवेदनाच्या माध्यमातून आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. नुकतीच त्यांची अखिल भारतीय नाट्य परिषद अहमदनगर उपनगर शाखेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे.
तसेच आरुष बेडेकर यांनी अतिशय कमी वयात बाल शंकर महाराज, नागनाथमहाराज आणि बोक्या सातबंडे या भूमिकेतून एक वेगळा ठसा उमटवून नगरच्या मातीचा जणू गौरवच केला आहे. या भूमिकांसाठी त्याला आत्तापर्यंत मटा सन्मान, कलर्स मराठी अवॉर्ड यासारखे अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
पिता पुत्राच्या या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव पद्मश्री पं. विजयजी घाटे, समर्थ भक्त मंदारबुवा रामदासी, प्रसिद्ध उद्योजक नरेंद्रजी फिरोदिया, आमदार संग्राम जगताप, डॉ.एस.एस. दीपक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या गौरव सोहळ्यास सर्व नगरकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन अनाहतच्या वतीने करण्यात आले आहे.