जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- शासनाकडून दहा एकर क्षेत्र मिळालेल्या अंबादास लहानु सूर्यवंशी या कर्जत येथील माजी सैनिकाच्या शेत जमीनीवर ताबा मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या व त्यांच्या कुटुंबीयांना जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर ॲट्रोसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. याप्रकरणी माजी सैनिक सुर्यवंशी कुटुंबीयांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले.
अंबादास सूर्यवंशी माजी सैनिक असून, त्यांनी 1965 ते 1971 च्या लढ्यामध्ये भाग घेतला होता. 1966 मध्ये रवळगाव (ता. कर्जत) येथे शासनाकडून 10 एकर क्षेत्र मिळाले होते. त्यावेळी सैन्य दलात कार्यरत असल्याने त्यांच्याकडून जमिनीची मिळालेली ऑर्डर गहाळ झालेली आहे. त्यामुळे जमिनीचे खाते उतारे बनवण्याचे राहून गेले. ते जमीन त्यांच्या ताब्यात असून, विहित करीत होते. सात ते आठ वर्षापासून एका व्यक्तीला जमीन वाट्याने दिलेली होती. दोन वर्षापासून शेत पिकाचा वाटा देणे बंद केल्याने त्या व्यक्तीने शेती विहित करण्यास मनाई केली व त्या ठिकाणी तुरीचे पीक पेरलेले असताना तो व्यक्ती जबरदस्तीने त्या शेतावर हक्क बजावत आहे. 6 सप्टेंबर रोजी माजी सैनिकाची पत्नी शेतात गेली असता, त्या व्यक्तीने दमदाटी करुन जातीवाचक शिवीगाळ केली. तर धक्काबुक्की करुन जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शेती करण्यास व पीक घेत असताना सदरचा व्यक्ती विरोध करत आहे. सदर व्यक्तीवर मिरजगाव पोलीस स्टेशन येथे माजी सैनिकाचे कुटुंबीय गेले असता, पोलीस उपनिरीक्षक यांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी तात्काळ संबंधितावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा 14 ऑक्टोबरला जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.