तर झाडे लावणाऱ्यांना ग्लोबल ग्रीन क्रेडिट सन्मान देण्याची पीपल्स हेल्पलाईनची मागणी
राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा वृक्षलागवडीसाठी शिष्टमंडळ घेणार केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांची भेट
अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनाला चालना देण्यासाठी भारतीय संविधानातील मुलभूत कर्तव्यामध्ये वृक्षाबंधन हे बंधनकारक करावे व वृक्षाबंधन कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या व्यक्तीने झाडे लागवडीसाठी खड्डे, दोन ते तीन वर्षांचे रोपं, ट्रीगार्ड, रेनगेनबॅटरी व झाडे लावल्यानंतर रोपांची पाच वर्षे काळजी घेणाऱ्या व्यक्तींना ग्लोबल ग्रीन क्रेडिट असा सन्मान सरकारने दिला पाहिजे अशी मागणी पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आली आहे.
भारतामध्ये कोणत्याही व्यक्तीने सरकारच्या कोणत्याही सवलत मिळविण्यासाठी पाच वर्षांतून किमान एक तरी वृक्षाबंधन केले पाहिजे.वृक्षाबंधन म्हणजे पृथ्वीला बांधलेली जिवंत राखी आहे. प्रत्येक सरकारी पगारी नोकर, पेन्शन घेणारा निवृत्त सरकारी नोकर, रेशनकार्ड लाभार्थी, जातीचा दाखला किंवा कोणत्याही दाखल्यासाठी वृक्षाबंधन केल्याचा पुरावा बंधनकारक असला पाहिजे. नुकतीच लाडक्या बहिणींना मिळणारी सवलत चालूच ठेवण्यासाठी वृक्षाबंधन सक्तीचे असले पाहिजे. बँकेचे कर्ज आणि अनुदान मिळविण्यासाठी व सर्व योजना चालू ठेवण्यासाठी किमान एकतरी वृक्षाबंधन करण्यासाठी बंधनकारक करण्याची भूमिका संघटनेच्या वतीने मांडण्यात आली आहे.
देशभरातील छोटमोठ्या रस्त्यांच्या दुतर्फा किमान शंभर झाडांचे वृक्षाबंधन करणे बंधनकारक असायला हवे. राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येक किलोमीटर अंतरावर शंभर झाडांचे वृक्षाबंधन हे बंधनकारक असायला हवे, त्याशिवाय टोल वसूली करता येणार नाही. राष्ट्रीय महामार्गावर इलेक्ट्रीक वाहनांच्या वापरावर 50 टक्के टोलमध्ये सुट व घरांच्या छतावर सोलर उपकरणे वापरणाऱ्यांना 50 टक्के घरपट्टी मध्ये सुट देण्याच्या मागणी संघटनेने केली आहे.
ज्या कंपन्या किंवा व्यक्ती वृक्षाबंधन करतील त्या व्यक्तींना ट्रीगार्डवरती मोफत जाहिराती करता येतील. शेतकऱ्यांनी फळबागांच्या स्वरूपात वृक्षाबंधन केले तर सरकारकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक सवलत दिली पाहिजे. यापुढे ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभा किंवा कोणत्याही निवडणुका लढवायच्या असतील तर वृक्षाबंधनाचा पुरावा देणे बंधनकारक असेल.
यापुढे रस्त्यावर दुचाकी, चारचाकी किंवा विमानाने प्रवास करणाऱ्या व्यक्तींना वृक्षाबंधन केल्याचा पुरावा बंधनकारक केला पाहिजे. गुगलमॅपद्वारे निसर्गप्रेमींना वृक्षाबंधनाची खात्री करण्याचा अधिकार दिला पाहिजे. विद्यार्थ्यांनी वृक्षाबंधन केले पाहिजे व त्यांच्या पदवीच्या प्रमाणपत्रावर ग्रीन क्रेडिटचा शिक्का देण्यात यावा यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना लवकरच संघटनेचे प्रतिनिधी भेटणार असून देशभरातील राजमार्गांच्या दुतर्फा वृक्षाबंधन सक्तीचे करून देशवासीयांना राष्ट्रीय ग्रीन गॅरंटी बहाल करा असा आग्रह संघटना धरणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली. या अभियानासाठी ॲड. गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, ओम कदम, वीर बहाद्दूर प्रजापती, कैलास पठारे, विठ्ठल सुरम आदी प्रयत्नशील आहेत.