युवकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या विषारी ताडी विक्रेत्यावर गुन्हा दाखल व्हावा
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीने दिला आंदोलनाचा इशारा
नगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुक्यातील मौजे ढवळपुरीत विषारी ताडीने युवकाचा जीव गेला असताना संबंधित विषारी ताडी विक्री करणाऱ्यावर कलम 304, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करावा, ढवळपुरी परिसरात ताडीचा सप्लाय करणाऱ्या दुकानाचा परवाना रद्द करावा व पारनेरमध्ये विषारी ताडीने अनेकांचा जीव जात असताना पांगरमलची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तातडीने दक्षता घेऊन कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीचे निवेदन जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी पोलीस अधीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय व राज्य उत्पादन शुल्क कार्यालयास दिले असून, सदर प्रकरणी कारवाई न झाल्यास 9 डिसेंबर रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
पारनेर तालुक्यातील मौजे ढवळपुरीतील रमेश मधुकर बर्डे हा युवक 25 नोव्हेंबर रोजी वडिलांच्या दशक्रिया विधीचे सामान आणण्यासाठी गेला होता. त्याच्याबरोबर त्याचा मामाचा मुलगा अनिल गांगुर्डे हा देखील होता. सायंकाळी रमेश याने एका घरातून ताडी पिऊन दशक्रिया विधीचे सामान घरी आनले. घरी गेल्यानंतर त्याला उलटी होण्यास सुरुवात झाली व उलटी झाल्यानंतर तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला नगर शहरातील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. ताडी विक्रेत्याने बनवलेली विषारी केमिकलयुक्त ताडी पिऊन सदर युवकाचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
रमेश बर्डे हा आदिवासी समाजातील असल्याने राजकीय लोक जाणीवपूर्वक हे प्रकरण दाबत आहे. पारनेरमध्ये पांगरमलची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. असून यापूर्वी ढवळपुरी येथील शिवराम भले याने देखील विषारी ताडीचे सेवन केल्याने तो मयत झाला. त्याचबरोबर काळु नदी, वनकुटे, गाजदीपुर, जामगाव येथील सुद्धा पाच ते सहा व्यक्तींचे आदिवासी समाजाचे व्यक्ती विषारी केमिकलयुक्त ताडी पिल्याने मयत झाले आहेत. जाणीवपूर्वक हे प्रकरण दडपले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रमेश बर्डे या युवकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या ताडी विक्रेत्यावर भादवि कलम 304, 34 प्रमाणे व एनडीपीएस कायदा कलमान्वये गुन्हा दाखल व्हावा, ढवळपुरी फाट्यावरील सरकार मान्य ताडीच्या दुकानाचा परवाना रद्द करावा व पांगरमल सारखी भीषण दुर्घटना होण्यापूर्वी प्रशासनानी दक्षता घेण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे.