श्री विशाल गणेश मंदिरात पोस्टरचे अनावरण
नगरच्या मातीत जन्मलेल्या स्वरचित गीत रचनांचे सादरीकरण तसेच गायन, वादन आणि नृत्याचा अनोखा कलाविष्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- पुनीत बालन ग्रुप सादर तालचक्र (पुणे) व अनाहत एक कलासृष्टी (अ.नगर) यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात 31 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6.30 वाजता नंदनवन लॉन्स, न्यू टिळक रोड येथे नगरच्या मातीत जन्मलेल्या स्वरचित गीत रचनांचे सादरीकरण नवनगरी सूर आणि पद्मश्री पं. विजयजी घाटे यांच्या संकल्पनेतून तयार झालेला कार्यक्रम ताल दिंडी सादर होणार आहे. या पार्श्वभूमीवर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरात या कार्यक्रमाच्या पोस्टरचे अनावरण श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानचे अध्यक्ष ॲड. अभय आगरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी पुजारी संगमनाथ महाराज, सुफी गायक पवन नाईक, डॉ. नीरज करंदीकर, डॉ. दीप्ती करंदीकर, प्रसाद सुवर्णपाठकी, अविनाश शिरापुरी, विलास बडवे, चंद्रकांत पंडित,संतोष खोल्लम, अमित डोंगरे, अभिजीत अपस्तंभ, वेदांत कुलकर्णी,मोहिनी खोल्लम, राधिका सुवर्णपाठकी, श्रेया सुवर्णपाठकी, स्नेहा कुलकर्णी आदी उपस्थित होते.
ॲड. अभय आगरकर म्हणाले की, शहरातील कला-रसिक सांस्कृतिक ठेवा जपण्याचे काम अनाहत करत आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमातून श्रोत्यांना एक वेगळी पर्वणी मिळणार आहे. या माध्यमातून कलाकारांना एक व्यासपीठ व श्रोत्यांना चांगल्या कार्यक्रमाची उपलब्धी मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
नवनगरी सूर या कार्यक्रमात नगर मधीलच कलाकार सहभागी होणार आहेत. तर ताल दिंडी या कार्यक्रमात पद्मश्री पं. विजय घाटे, सुप्रसिद्ध बासरीवादक अमरजी ओक, पखवाज वादक ओंकार दळवी, संवादिनी वादक अभिषेक शिनकर, सुप्रसिद्ध नृत्यांगना शीतल कोलवालकर, तबला वादक सागर पटोकर, युवा पिढीतील आश्वासक गायक सुरंजन खंडाळकर आणि विनय रामदासन, सुप्रसिद्ध निवेदक मिलिंद कुलकर्णी हे सर्व पुणे येथील कलाकार आपली कला सादर करणार आहेत. तरी सर्व नगरकर रसिकांनी, संगीत साधकांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन अनाहतच्या वतीने करण्यात आले आहे. प्रवेशिकांसाठी 7972024059, 9309718151, 9518733946 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.