भिंगार हायस्कूलच्या 1975 मधील अकरावीच्या बॅचचा स्नेह मेळावा उत्साहात
अहमदनगर (प्रतिनिधी)- भिंगार हायस्कूल मधील सन 1975 च्या इयत्ता अकरावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. आजी-आजोबा झालेले माजी विद्यार्थी तब्बल 47 वर्षानंतर एकत्र आले होते. एवढ्या प्रदीर्घ काळानंतर उतार वयात एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींना आपल्या शालेय जीवनातील मित्रांना ओळखणे देखील अवघड बनले होते.
या स्नेह मेळाव्यात हयात असलेल्या गुरुजनांचा सन्मान करण्यात आला. वयाचे 65 वर्ष ओलांडलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी सकाळी शाळेला भेट देऊन आपल्या शालेय जीवनातील जुन्या आठवणीत रममाण झाले होते. या मेळाव्यासाठी कामानिमित्त इतर शहरात गेलेले विद्यार्थी व विवाह होऊन गेलेल्या माजी विद्यार्थीनी महाराष्ट्रभरातून एकवटल्या होत्या.
सुदीप मुळे यांनी शाळेची घंटा वाजवून उपस्थितांना शाळा भरल्याच्या जुन्या आठवणीत नेले. उपस्थित गुरुजन व मित्र-मैत्रिणींनी प्रार्थना म्हंटली. सूर्यकांत (नाना) देशमुख यांनी शाळा सुटल्याची घंटा वाजवताच उपस्थितांनी शाळा सुटल्याचा आनंद लुटला. तर यावेळी विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले. शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊन सिताबन लॉन येथे मुख्य कार्यक्रम सोहळा पार पडला. शेखर चौधरी यांनी सर्व विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प तर डॉली जालनावाला व मर्यान यांनी मैत्रिणींना मेहंदीचे कोन देऊन स्वागत केले. दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
प्रारंभी निधन झालेले गुरुजन व माजी विद्यार्थ्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. मंगल गाडेकर यांनी प्रास्ताविकात शाळेच्या आठवणी सांगितल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष एस. डी. कुलकर्णी सरांनी त्या काळातील विद्यार्थ्यांच्या आठवणी सांगून, अनेक विद्यार्थी उच्च पदावर जावून शाळेचे व गुरुजींचे नांव ऊंचावले असल्याची भावना व्यक्त केली. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने भिंगार हायस्कूलला ऍम्प्लिफायरची भेट देण्यात आली. यावेळी श्रीकांत तरवडे, जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, डॉ. दिलीप बोरा यांनी मनोगत व्यक्त केले. माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत 47 वर्षांपूर्वीचा काळ सर्वांच्या डोळ्यासमोर उभा केला. जुन्या भावनांना स्पर्श करुन, वातावरण भावनिक केले. शिक्षक पद्माकर देशपांडे, विजय मुळे, तारखा देशमुख, गावडे सर, दंडवते मॅडम, होनराव मॅडम, भिंगार हायस्कूलचे मुख्याध्यापक बेद्रे सर, भिंगार अर्बन बँकेचे व्हाईस चेअरमन किसनराव चौधरी, शिवकुमार पंचारिया, प्रकाश तरवडे, प्रमोद भुते, संदीप मुळे आदी उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्त्या नगरसेविका डॉ. मंगल गोंधळे-गाडेकर, अनिल झोडगे, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप बोरा, निवृत्त अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे एका विवाह सोहळ्यात एकत्र आले होते. त्यांच्या संकल्पनेतून अकरावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा घेण्याचे ठरले होते. या मेळाव्यासाठी भिंगार येथील रमेश त्रिमुखे, शिवकुमार पंचारिया, प्रकाश तरवडे, शंकर कोष्टी, डॉली जालनावाला, माधव रामनमाळकर, नाना देशमुख, नंदकुमार भोसले यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व मित्र-मैत्रिणींना एकत्र करण्याचे कार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदीप मुळे यांनी केले. आभार रमेश त्रिमुखे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.