नूतन अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, सचिव प्रसाद मांढरे व खजिनदार संदीपसिंग चव्हाण यांनी स्विकारली पदाची सूत्रे
आपत्कालीन परिस्थितीत लायन्स नेहमीच समाजाच्या पाठिशी उभा राहिला -आ. संग्राम जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात मागील 29 वर्षापासून सामाजिक योगदान देणार्या लायन्स क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनचा तिसवा पदग्रहण सोहळा आमदार संग्राम जगताप व लायन्सचे उपप्रांतपाल परमानंद शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. क्लबचे नुतन अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, सचिव प्रसाद मांढरे व खजिनदार संदीपसिंग चव्हाण यांना पदाची सूत्रे प्रदान करण्यात आली.
सावेडी येथील कोहिनूर मंगल कार्यालयात झालेल्या पदग्रहण सोहळ्यासाठी लायन्सचे विभागीय अध्यक्ष सुनिल साठे, विभाग अध्यक्ष आनंद बोरा, क्लबचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत मांढरे, अनिल कटारिया, कॅबिनेट ऑफिसर प्रविण गुलाटी, रेश्मा शर्मा, माजी अध्यक्षा संपुर्णा सावंत आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. क्लबच्या माजी सचिव डॉ. कल्पना ठुबे यांनी शहरात क्लबच्या स्थापनेपासूनचा आढावा घेऊन विविध कायमस्वरूपी शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य क्षेत्रात उभे केलेल्या प्रकल्पाची माहिती दिली. सुनंदा तांबे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मावळत्या अध्यक्षा संपुर्णा सावंत यांनी त्यांच्या कारकिर्दीत राबविलेल्या सामाजिक कार्याची माहिती देताना सांगितले की, क्लबच्या माध्यमातून विविध दीडशे उपक्रम राबवून, क्लब नगर झोनमध्ये पहिल्या दहात अग्रभागी राहिला. क्लबच्या विशेष कार्याची दखल घेऊन सर्वात जास्त बक्षिसे मिळवण्याचा बहुमान देखील मिळाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, लायन्सने टिमवर्कने शहरात मोठे सामाजिक कार्य उभे केले. त्यांचे सामाजिक क्षेत्रात सातत्याने काम सुरू आहे. कोरोना काळात लायन्सने गरजूंना दिलेली मदत न विसरता येणार असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत लायन्स नेहमीच समाजाच्या पाठिशी उभा राहिला. माणुसकीच्या भावनेने एकमेकांच्या मदतीला धावून जाण्याचे संस्कार लायन्स समाजात रुजवत असल्याचे त्यांनी सांगितले. तर नवीन कार्यकारणीला सामाजिक कार्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
परमानंद शर्मा म्हणाले की, दुर्बल, शोषित, वंचित, पिडीतांना सेवा देऊन, त्यांना समाजाच्या प्रवाहात आनण्याचे कार्य लायन्स करीत आहे. लायन्सने शहरात आपल्या सामाजिक कार्यातून एक वेगळी ओळख निर्माण केली असून, लायन्स मिडटाऊनच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक करुन क्लबच्या नवीन पदाधिकार्यांना शपथ देऊन त्यांना पदाची व कर्तव्याची जाणीव करुन दिली. श्रीकांत मांढरे यांनी लायन्स मिडटाऊनने शहरासह जिल्ह्यात अविरतपणे 29 वर्ष जनसेवेचा ठसा प्रतिबिंबित केला.
लाईनीझम चळवळीत सर्व सदस्य पैसा, वेळ व श्रमाने सामाजिक योगदान देत असून, ही चळवळीमुळे अनेक गरजूंना आधार मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले व क्लबचे नव्याने सदस्य झालेले प्रफुल्ल मुथा, नितीन देशमुख, राजेंद्र म्याना, सुरेंद्र मुथा, प्राचार्या शोभा भालसिंग, प्रा. स्वाती जाधव, शारदा पवार यांना शपथ दिली. नुतन अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी लायन्स क्लब तळागाळापर्यंत सामाजिक कार्य करत आहे. क्लबच्या माध्यमातून शहरात कायमस्वरूपी प्रकल्प राबविण्याचे सांगून शहरात लायन्सचे मोठे उद्यान उभे करण्याचा संकल्प व्यक्त केला.
ज्ञानेश्वरी मिलिंद जोशी या विद्यार्थिनीने नॅशनल ओलंपियाड मध्ये देशासाठी सिल्वर व गोल्ड पदक मिळवल्याबद्दल तिचा गौरव करण्यात आला. तर कार्यक्रमात गणेश वंदना सादर करणारी अनुजा देशमुख या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. रविंद्र कुटे, अॅड. रविंद्र शितोळे, भिंगार नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष शैलेश धोकटे, अहमदनगर फटाका असोसिएशनचे सुरेश जाधव, महेश केवलरमानी, संतोष तोडकर, दाजी गारकर, सहजयोगचे मेजर कुंडलिक ढाकणे, बाळासाहेब बिराजदार, संवाद प्रतिष्ठानचे विनय गुंदेचा, रुपाली मॅथ्यू, संगिता पवार, संजय भालेराव, पद्मशाली समाजाचे बाळकृष्ण गोटीपामुल, तिरमलेश पासकंठी, अजय म्याना, सुमित न्यालपेल्ली, रवी दंडी, सागर महेसुनी, वैभव कंदी, उदय सुरम, विनोद बोगा, सागर बोगा आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनंदा तांबे यांनी केले. आभार अनिल कटारिया यांनी मानले.