अहमदनगर हे महाराष्ट्रातील शहर सीना नदीच्या काठावर वसलेले आहे.
ऐतिहासिक वस्तू संग्रहालय शहर स्थापनादिनानिमित्त सर्वांसाठी खुले
अहमदनगर (प्रतिनिधी)- 15 व्या शतकाच्या शेवटी, इ.स. 1486 मध्ये तत्कालीन बहामनी राज्याचे पाच तुकडे झाले. त्यामधून फुटून निघालेल्या मलिक अहमदशहा बहिरी या निजाम शहाने मे इ.स. 1490 मध्ये सीना नदीकाठी पूर्वीच्या भिंगार शहराजवळ नवीन शहर वसवण्यास सुरुवात केली. याच्या नावावरूनच या शहराला अहमदनगर असे नाव पडले. 1494 मध्ये शहर रचना पूर्ण होऊन अहमदनगर निजामशहाची राजधानी बनले. या शहराची तुलना त्या काळी कैरो, बगदाद या समृद्ध शहरांशी केली जात असे. अहमदशहा, बुर्हाणशहा, सुलताना चाँदबिबी यांची कारकीर्द असणारी निजामशाही येथे 1636 पर्यंत टिकली.
मोगल बादशहा शहाजहानने इ.स. 1636 मध्ये अहमदनगर काबीज केले. इ.स. 1759 साली पेशव्यांनी अहमदनगरवर ताबा मिळवला तर 1817 मध्ये ब्रिटिशांनी अहमदनगर घेतले. शहरात अहमदनगरचा किल्ला, रेणुकामाता मंदिर (केडगांव), फराह बाग, आलमगीर, बागरोजा, भिस्त बेहस्त बाग, बुर्हाण नगर व चाँदबीबी महल (सलाबत खान मकबरा) अशी अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. या शहराला नगर या नावानेसुद्धा ओळखतात.
मराठ्यांच्या कर्तृत्वाच्या उदयकाली विठोजी भोसले, मालोजी भोसले, लखुजीराजे जाधव, निंबाळकर, पवार, बाजी कदमराव हे निजामशाहीचा चौथा सुलतान मुर्तझा निजामशाह आणि पुढे मलिक अंबर ह्याच्या बरोबर सेवेत होते. अहमदनगर शहराचे जगाच्या नकाशावरचे स्थान 19.08ओ उत्तर अक्षांश, 74.73ओ पूर्व रेखांश असे आहे व शहराची समुद्रसपाटीपासून उंची 649 मीटर आहे. गोदावरी नदी व कृष्णा नदीची उपनदी भीमा या दोन मुख्य नद्या अहमदनगर जिल्ह्यातून वाहतात. बाकीच्या नद्या- प्रवरा, मुळा ही गोदावरीची उपनदी आहे. प्रवरा नदीचे पाणी उंचावरून पडून रंधा धबधबा तयार झला आहे.
संत ज्ञानेश्वर यांनी अहमदनगर जवळील नेवासा येथे ज्ञानेश्वरी लिहिली. महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांची सर्वात जास्त चरणांकित स्थाने नगरमध्येच आहेत. साईबाबा हे अहमदनगर जवळील शिर्डी ही कर्मभूमी असणारे संत होते. आचार्य आनंद ऋषीजी महाराज, अवतार मेहेर बाबा, दास गणूमहाराज, सदाशिव अमरापूरकर प्रसिद्ध हिंदी – मराठी सिने अभिनेते, रावसाहेब पटवर्धन थोर स्वातंत्र्यसेनानी, अच्युतराव पटवर्धन थोर स्वातंत्र्यसेनानी, बाळासाहेब भारदे भाई सथ्था कम्युनिस्ट नेते, सेनापती दादा चौधरी कम्युनिस्ट नेते, मधू दंडवते संसदपटू, कवी नारायण वामन (रेव्हरंड) टिळक, लक्ष्मीबाई टिळक, अण्णा हजारे (किसन बाबूराव हजारे) हे भारतातील नावाजलेले व्यक्तीमत्व आहेत. तर इ.स. 1942 मध्ये येथे जवाहरलाल नेहरू यांना इंग्रजांनी भुईकोट किल्ल्यात कैदेत ठेवले होते. तेथे त्यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ लिहिला.
मुंबई – विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग 222 अहमदनगर शहरातून जातो. अहमदनगर हे पुणे, औरंगाबाद, सोलापूर, नाशिक, बीड या महाराष्ट्रातील प्रमुख शहरांशी राज्य महामार्गांनी जोडले गेले आहे. दौंड-मनमाड लोहमार्गावरील अहमदनगर हे महत्त्वाचे स्थानक आहे. येथून जाणार्या सर्व प्रवासी रेल्वेगाड्या अहमदनगरला थांबतात.
अहमदनगर शहराच्या वैभवात भर घालणारी वास्तू ऐतिहासिक वस्तू संग्रहालय शहर स्थापनादिनानिमित्त सर्वांसाठी खुले होत आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी अनिलजी कवडे, सध्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले, कार्यकारी विश्वस्त डॉ. रवींद्र साताळकर यांच्या प्रयत्नातून या वस्तूच्या नुतनीकरणासाठी जवळपास 3 कोटी रुपये खर्च झाले आहेत. यामुळे शहरातील पर्यटन ठिकाण म्हणून नावरुपाला येणार आहे. नगर शहराचा इतिहास, प्राचीन ग्रंथ संपदा, दस्त ऐवज, नाणी, हत्यारे येथे पहावयास मिळतील. येथे स्वतंत्र स्पर्धा परीक्षा अभ्यासिका तयार होत आहे. अशा या ऐतिहासिक शहराला 532 वर्ष पूर्ण होत आहेत. शनिवार दि. 28 मे 2022 रोजी ऐतिहासिक वस्तू संग्रहालय सर्वांना पाहण्यासाठी खुले आहे. 29 मे 2022 रोजी स्थापना दिनानिमित्त संग्रहायल उद्यान लोकार्पण, मोडीकिरण पुस्तक प्रकाशन व सरदार आबासाहेब मुजुमदार पुरस्कार वितरण कार्यक्रम ऐतिहासिक वस्तू संग्रहालय या ठिकाणी सकाळी 11 वाजता होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.