अधिका-यांच्या पगाराबरोबरच दिव्यांगचे उदरनिर्वाह अनुदान नियमीत वर्ग करा – बाबासाहेब महापुरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- शासन निर्णयानुसार अहमदनगर महानगर पालीकेच्या झालेल्या ठरावा प्रमाणे सन 2017 पासुन दिव्यांग बांधवांना देण्यात येणारे अनुदान नियमीत मिळत नाही. दोन तीन महीन्यानंतर एखाद्या महीन्याचे अनुदान दिव्यांगांच्या खात्यात वर्ग होते. अनेक महीन्याचे अनुदान थकीत असल्यामुळे दिव्यांग बांधवामध्ये महानगरपालीका प्रशासना विरोधात प्रचंड नाराजी पसरलेली आहे.
दिव्यांगांना प्रती महिना नियमीत अनुदान मिळण्यासाठी 13 जुलै 2022 रोजी आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा सावली दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे, बाहुबली वायकर यांनी दिला आहे. उदरनिर्वाह अनुदानात प्रतीवर्षी 10 टक्के वाढ करण्यात यावी, दिव्यांगासाठी प्रधानमंत्री आवास योजना स्वतंत्र पणे राबवावी, दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी स्टॉल टपरी साठी अधिकृत परवानगी मिळावी, दिव्यांगासाठी निवारा भवनाची व्यवस्था करावी यासारख्या अनेक मागण्यांचे पत्र महानगरपालीकेचे आयुक्तांना देण्यात आलेले आहे. मागण्याबाबत सकारात्मक विचार न झाल्यास आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.