खेळाकडे करिअरची संधी म्हणून पहावे -प्राचार्य बी.बी. अंबाडे
अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाकडे विशेष लक्ष द्यावे. खेळाकडे करिअरची संधी म्हणून पहावे, असे प्रतिपादन प्रवरा पब्लिक स्कूलचे प्राचार्य डॉ.बी.बी. अंबाडे यांनी केले.
प्रवरा पब्लिक स्कूल प्रवरानगर येथे अहमदनगर जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी अंबाडे बोलत होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील जवळपास 1100 खेळाडूंनी सहभाग नोंदविला. 14, 16, 18, 20 व 23 वर्ष वयोगटासाठी या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेतील प्रथम दोन क्रमांक प्राप्त खेळाडू 19 ते 22 सप्टेंबर दरम्यान बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असल्याचे सचिव दिनेश भालेराव यांनी सांगितले.
या स्पर्धा पूर्ण करण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व सीईओ डॉ. सुष्मिता विखे पाटील यांनी शाळेचे मैदान व क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून क्रीडा शिक्षक रमेश वाघमारे, रमेश दळे, दिपक जाधव, राहुल काळे, प्रतीक दळे, किरण कडस्कर, अतुल डे, संदीप घावटे, सुजित बाबर, श्रीरामसेतु आवारी, कैलास शेळके, बापूसाहेब गायकवाड, अजित पवार, समीर शेख, कबीर शेख, अनिल पिंपळे, चांडे सर, विजय जाधव, भरत थोरात, अमित चव्हाण, गुलजार शेख, विश्वेशा मिस्किन, नेहा मोरे, साक्षी मोरे यांनी काम पाहिले. सर्व स्पर्धेचे नियोजन जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव दिनेश भालेराव यांनी पाहिले.