• Mon. Dec 9th, 2024

1 मे ला शालेय द्वितीय सत्र समाप्तीची घोषणा करावी

ByMirror

Mar 28, 2022

शालेय नियोजनानुसार परीक्षा घेण्याची शिक्षक परिषदेची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- शालेय नियोजनानुसार परीक्षा घेऊन, नियमीत 1 मे रोजी द्वितीय सत्र समाप्ती व जून 2022 मध्ये शाळा सुरू करण्याबाबतची तारीख घोषित करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन शिक्षक परिषद मुंबई विभागाचे अध्यक्ष उल्हास वडोदकर, कार्यवाह शिवनाथ दराडे, महिला आघाडी प्रमुख वैशाली नाडकर्णी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शालेय शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांना दिले असल्याची माहिती शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे यांनी दिली.
शिक्षक परिषदेने यापूर्वी मार्च मध्ये 1 मे रोजी शैक्षणिक सत्र समाप्तीची घोषणा करण्याची मागणी केली होती. मात्र शासनाने 24 मार्च रोजी या वर्षीच्या परीक्षा व निकालबाबत शासन आदेश निर्गमित केला आहे. त्यानुसार परीक्षा घेऊन निकाल तयार करण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होणार नाही. शाळेच्या नियोजनाप्रमाणे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून अनेक शाळांनी परीक्षा घेण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे 15 एप्रिल पर्यंत राज्यातील सर्व शाळांचे सर्व इयत्तांचे परीक्षा संपत आहे. त्यामुळे उर्वरित काळामध्ये उत्तरपत्रिका तपासणे, निकाल तयार करणे यांसाठी काही दिवसांचा कालावधी आवश्यक असतो. अनेक शाळांनी निकालाच्या तारखा यापूर्वीच घोषित केलेल्या आहेत. त्यामुळे अनेक पालकांनी एप्रिलमध्ये तिसर्‍या आठवड्यापासून व त्या अगोदरच उन्हाळी सुट्टीत गावी जाण्याचे आरक्षण केलेले आहे. त्यामुळे 24 मार्च रोजीच्या शासन निर्णयानुसार एप्रिलच्या तिसर्‍या आठवड्यात परीक्षा घेण्यास पालक, शाळा व शिक्षकांनी विरोध दर्शविला आहे. तसेच संबंधितांना नव्याने आरक्षण मिळणार नाही. त्यातच मागील दोन वर्षात कोरोनामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांना गावी जाता आलेले नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.

या सर्व बाबींचा विचार करून 24 मार्च रोजीचा शासन निर्णय रद्द करून, शाळांना त्यांच्या पूर्व नियोजित वेळापत्रकाप्रमाणे परीक्षा घेण्याबाबत अवगत करावे व पुढील शैक्षणिक वर्षात शाळा सुरू करण्याबाबतच्या स्पष्ट सूचना देण्याची मागणी शिक्षक परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू, शिक्षक आमदार गाणार, राज्य महिला आघाडी प्रमुख पुजाताई चौधरी, नरेंद्र वातकर, किरण भावठाणकर, माजी अध्यक्ष बाबासाहेब काळे, माजी आमदार भगवानअप्पा साळुंखे, सुमन हिरे, प्रा.सुनिल पंडित आदी राज्य कार्यकारणी सदस्य प्रयत्नशील आहेत.

शिक्षण विभागाने 24 मार्च काढलेल्या पत्रामुळे शिक्षक, पालकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. शिक्षकांनी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अध्यापनाचे कार्य सुरळीतपणे केले आहे. अनेक शाळांनी परीक्षा घेतल्यानंतर 30 एप्रिलपर्यंत दहावी, बारावीचे वर्ग भरविण्याचे नियोजन केले असून, 1 मे ला निकाल लावला जाणार आहे. सर्व नियोजन झालेले असताना काढलेले पत्र कशासाठी व कोणासाठी? हा प्रश्‍न अनेकांना पडला आहे. वाढते तापमान पाहता उन्हाळ्यामध्ये अकरा ते पाच शाळा सुरू ठेवणे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला हानीकारक ठरणार आहे. शासनाने या निर्णयाचा फेर विचार करावा. -बाबासाहेब बोडखे (शिक्षक परिषद नेते)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *