आडगावला 111 झाडांची लागवड
हरिनाम सप्ताहातील भाविक व शालेय विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात डोंगररांगा, टेकड्या व ओसाड माळरानात हिरवाई फुलविण्यासाठी माजी सैनिकांच्या जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरु असलेल्या वृक्षरोपण अभियनातंर्गत आडगाव (ता. पाथर्डी) येथे 111 झाडांची लागवड करण्यात आली. तर संत बाळूमामा सप्ताह कमिटीच्या वतीने गावात राबविण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहातील भाविक व शालेय विद्यार्थ्यांना रोपांचे वाटप करण्यात आले.
संत बाळूमामा सप्ताह कमिटीचे अध्यक्ष ह.भ.प. बाबासाहेब गडकर महाराज यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन या अभियानाची सुरुवात करण्यात आली. गाव परिसरात झाडे लाऊन विद्यार्थ्यांना घराच्या अंगणात व शेतीच्या बांधावर झाडे लावण्यासाठी रोपांचे वाटप करण्यात आले. यामध्ये चिंच, आंबा, जांभुळ, करंज व फुलझाडांचा समावेश होता.
ह.भ.प. बाबासाहेब गडकर महाराज म्हणाले की, जय हिंदची पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपणाची चळवळ दिशादर्शक आहे. विद्यार्थ्यांना वृक्षरोपण व संवर्धनाबद्दल आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने राबविण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद असून, भविष्यात मुलांच्या हातून खर्या अर्थाने पर्यावरण संवर्धन होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
फाउंडेशनचे शिवाजी पालवे यांनी अखंड हरिनाम सप्ताहासाठी ज्या पध्दतीने ग्रामस्थ एकत्र येतात, त्याप्रमाणे वृक्षरोपण चळवळीसाठी एकत्र येण्याची गरज आहे. अध्यात्मिक कार्याला सामाजिक जोड देऊन पर्यावरणाचे प्रश्न सोडविता येणार आहे. येणार्या काळात आडगावात फळ व फुल झाडे बहरुन गावात निसर्गाचे चैतन्य फुलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमासाठी सरपंच लक्ष्मण भानगुडे, सूर्यभान लोंढे, बाबासाहेब लोंढे, संदीप नजन, बाजीराव गोफणे, लाला लोंढे, दशरथ कांबळे, सुखदेव लोंढे, विठ्ठल गडकर, दिनकर लोंढे, अनिल भानगुडे, विठ्ठल लोंढे, बाप्पू भानगुडे, दिनकर लोंढे, अनिल भानगुडे, बाप्पू भानगुडे, गोरख गोफणे, जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, शिवाजी पठाडे, कृष्णा काकडे आदी उपस्थित होते.