खराब रस्त्यामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे हाल
आमदार निलेश लंके यांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी हिंगणगाव फाटा (कल्याण रोड) बाराखोंगळा मार्गे रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करण्याच्या मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने आमदार निलेश लंके यांना ग्रामपंचायत सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांनी दिले.
निमगाव वाघा ते हिंगणगाव फाटा (कल्याण रोड) बाराखोंगळा मार्गे या रस्त्याचे काही महिन्यांपूर्वी आमदार निलेश लंके यांच्या पाठपुराव्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन किलोमीटर रोडचे मजबुतीकरण व डांबरीकरणचे काम केले होते. उर्वरित दीड किलोमीटर रस्ता तसाच राहिल्याने सदरील रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या रस्त्यावर पावसामुळे चिखल साचले असून, अनेक ठिकाणी रस्त्यावर असलेल्या लहान-मोठे खड्डयात पावसाचे पाणी साचून डबके तयार झाले आहेत.
या रस्त्यावरुन ग्रामस्थांना येण्या जाण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत आहे. याच रस्त्यावर गावातील नवनाथ विद्यालय आहे. जास्त पाऊस झाल्यास सदर रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद होते. तर शालेय विद्यार्थ्यांना देखील येण्या-जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
निमगाव वाघा ते हिंगणगाव फाटा (कल्याण रोड) बाराखोंगळा मार्गे रस्त्याने राहिलेले दीड किलोमीटर रस्त्याचे मजबूतीकरण व डांबरीकरण करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने आमदार लंके यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी आमदार लंके यांचे स्वियसहाय्यक शिवा कराळे उपस्थित होते. निवेदनावर माजी सरपंच साहेबराव बोडखे,भाऊसाहेब कदम, पोपट कदम, बाबासाहेब डोंगरे, महादेव जाधव, बापू जाधव, चंद्रकांत पवार, भाऊसाहेब ठाणगे, भागचंद जाधव, गोरख चौरे, डॉ. विजय जाधव, दादा डोंगरे, एकनाथ डोंगरे, भरत बोडखे, संदिप डोंगरे, भाऊसाहेब जाधव आदींसह ग्रामस्थांच्या स्वाक्षर्या आहेत