स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदगाव (ता. नगर) ते जांभळी (ता. राहुरी) रस्ता करण्याची मागणी
दक्ष नागरिक फाउंडेशनचे मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- मुळा धरणाच्या पश्चिमेस असलेल्या लहान मोठी गावे व वाडी-वस्त्यांना जोडणारा नांदगाव (ता. नगर) ते जांभळी (ता. राहुरी) रस्ता स्वातंत्र्योत्तर काळापासून प्रलंबीत असून, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी संरक्षण विभागाची परवानगी मिळवून या भागातील जिव्हाळ्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी दक्ष नागरिक फाउंडेशनच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
फाऊंडेशनच्या शिष्टमंडळाने मुंबई येथील मंत्रालयात मुख्यमंत्री कार्यालयात सदरच्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी फाऊंडेशनचे नाशिक विभागीय अध्यक्ष प्रा. पंकज लोखंडे, रमेश आल्हाट, भिवा कोळपे, नितिन साठे, विजय जाधव, विजय साळवे, अनिल कोळपे, अशोक बाचकर, नारायण माने आदी उपस्थित होते.
अहमदनगर जिल्ह्यात मुळा धरण नाथसागर (ता. राहुरी) झाल्यापासून स्वातंत्र्यपूर्व काळापासून राहुरी तालुक्याचा काही भाग धरणाच्या पश्चिमेस आहे. त्यामध्ये प्रामुख्याने आंबळी, जांभुळबन, वावर या छोट्या गावांसह अनेक वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. सदर भाग तालुक्यापासून वेगळा आहे. या ठिकाणी असणार्या ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी दवाखाना, शासकीय कामे, न्यायालय, बाजारपेठ, शैक्षणिक इतर सर्व जीवनावश्यक गोष्टींसाठी ढवळपूरी, भाळवणी, अहमदनगर, राहुरी असे अंदाजे 125 किलोमीटरच्या रस्त्याने यावे लागते. कारण त्यांना जवळचा रस्ता अस्तित्वात असताना शासकीय व लष्करी प्रक्रियेत स्वातंत्र्यापासून प्रलंबित आहे. त्यासाठी ग्रामस्थ व इतर स्थानिक नेत्यांनी पाठपुरावा केला, मात्र त्यांना फक्त आश्वासने देण्यात आली. त्यावर कोणतीही कारवाई झालेली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
तथापि नांदगाव ते जांभळी हे अंतर अंदाजे 13 किलोमीटर आहे. यामध्ये एक छोटी नदी व एक ओढा आहे. सदर रस्ता वन विभागाचा परिसराच्या शेजारून जातो. सदर जागेवर लष्कराचे नियंत्रण असून, लष्करी विभागाशी पत्रव्यवहार केल्यास या रस्त्याचा प्रश्न सुटू शकणार आहे. सदरील गावांना जवळचा रस्ता सोडून तब्बल शंभर किलोमीटरचा हेलपटा मारावा लागत असून, अत्यावश्यक प्रसंगी ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तातडीने रुग्णालयात जाण्यासाठी वेळ लागल्याने अनेकांचा जीव देखील गेलेला आहे. या गावातील मुला, मुलींच्या प्रश्न निर्माण झालेला असून, शेतमालास बाजारपेठेत घेऊन जाण्यास देखील मोठी अडचण निर्माण होत असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
लहान मोठी गावे व वाडी-वस्त्यांना जोडणारा नांदगाव (ता. नगर) ते जांभळी (ता. राहुरी) रस्त्याचा आराखडा तयार करून परवानगीसाठी संबंधित विभागाला त्वरित आदेश देऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्याची मागणी दक्ष नागरिक फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.