चिखलमय रस्त्याने महिला, विद्यार्थी व नागरिक त्रस्त
भैरवनाथ मंदीर पासून उमराचा डोहो पर्यतचा प्रलंबीत रस्त्याचे काम मार्गी लावण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष उत्साहात साजरा होत असताना, नगर तालुक्यातील वाळकीचे ग्रामस्थांची रस्त्याअभावी परवड सुरु आहे. गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदीर पासून उमराचा डोहो पर्यत येणारे मळा रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. संपुर्ण रस्त्यावर चिखल व पाणी साचले असल्याने अनेक-लहान मोठे अपघात घडत असून, या रस्त्याचे काम त्वरीत मार्गी लावण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.
या रस्त्यालगत लहान-मोठ्या वस्त्या असून, त्यांच्या दळणवळणासाठी मोठी गैरसोय होत आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास ग्रामस्थांचा वाळकी गावापासून संपर्क तुटतो. नागरिकांना चालताना देखील मोठी कसरत करावी लागत आहे. रस्ता दलदलमय झाल्याने वाहने घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना व महिलांना आठवडे बाजारसाठी तर शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागत आहे.
मध्यंतरी सतत पाठपुरावा केल्याने चार ते पाच महीन्यांपूर्वी नदी पात्रातून रस्त्याचे मुरूम, खडी टाकून काम झाले आहे. परंतू पहिल्याच पावसात या रस्त्यांची मोठी दुरावस्था झाली. सध्या तात्पपुरती मलमपट्टी करण्यासाठी मुरुम टाकण्यात आला, मात्र त्यामुळे या रस्त्यावर अजून चिखल झाला आहे. या रस्त्याची अनेक वेळा अधिकारींनी पहाणी करुन गेले मात्र रस्ता केंव्हा होणार? हा सर्वसामान्य ग्रामस्थांचा प्रश्न निरुत्तर आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात सर्व राजकीय पुढार्यांनी राजकारण बाजूला ठेऊन ग्रामस्थांच्या सोयीसाठी या रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे भालसिंग यांनी म्हंटले आहे.