महिला दिनानिमित्त प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने
महिलांना सुखी-आनंदी जीवन विषयावर व्याख्यान
अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांना समाजात आजही दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असून, महिलांनी आपल्या कर्तृत्वाने सर्व क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण केले आहे. महिलांना कमी लेखून एक प्रकारे त्यांचे शोषण सुरु असून, पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये ही मानसिकता बदलण्यासाठी महिलांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे. स्त्री ही स्त्रीची वैरी नसून, पाठराखी आहे. महिलांनी एकमेकींना प्रोत्साहन व सहकार्याची भूमिका ठेवल्यास महिलांचे अनेक प्रश्न सुटणार असल्याचे प्रतिपादन अंजली ज्ञाती यांनी केले.
प्रयास ग्रुप व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने महिला दिनानिमित्त सुखी-आनंदी जीवन या विषयावर महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात ज्ञाती बोलत होत्या. यावेळी निवेदिका विना दिघे, स्वाती गुंदेचा, मयुरी लूने-गुप्ता, ग्रुपच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा, उपाध्यक्षा सविता गांधी, सचिव शोभा पोखरणा, शकुंतला जाधव, शशिकला झरेकर, उज्वला बोगावत, चंद्रकला सुरपूरिया, सुजाता पुजारी आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रास्ताविकात अलकाताई मुंदडा यांनी मागील पंचवीस वर्षापासून महिलांसाठी प्रयास ग्रुप कार्य करीत आहे. एका दिवसापुरता महिला दिन साजरा न करता, वर्षभर महिलांसाठी या ग्रुपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जातात. महिलांच्या सक्षमीकरणाच्या उद्देशान त्यांना प्रोत्साहन देऊन, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रम घेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी थालपीठ विक्रीचा व्यवसाय करून कुटुंब चालविणारी श्रध्दा चाफेकर तर शहरात महिलांसाठी एक आकर्षक मॉल उभी करणारी मयुरी लूने-गुप्ता या स्वकर्तृत्वाने आपले असतित्व निर्माण करणार्या महिलांचा गौरव करण्यात आला.
निवेदिका विना दिघे म्हणाल्या की, नवीन वर्षात केलेले संकल्प बरेच फसतात. महिलांनी महिला दिनी जीवनात आनंद वाढविणारे नवनवीन संकल्प करावे. त्रासदायक असलेले संकल्प पूर्ण होत नाही. आवड असलेल्या क्षेत्राशी निगडित संकल्प केल्यास छंदासाठी वेळ देता येतो व सुप्त कलागुणांना वाव देखील मिळतो. एकविसाव्या शतकात वावरत असताना महिलांनी सोशल मीडियाच्या पलीकडे जाऊन इतर नवीन तंत्रज्ञानाशी निगडीत नवीन गोष्टीचे ज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन त्यांनी केले. स्वाती गुंदेचा यांनी हॅपी थॉट्स बद्दल मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, आनंदी जीवनाबद्दल स्वतःसाठी वेळ देणे गरजेचे आहे. प्रत्येक महिला परिपूर्ण असून, स्वत:चा स्विकार करा. विश्वात प्रत्येक गोष्टी निर्माण होण्यापूर्वी त्याची विचारांमध्ये निर्मिती होत असते. नको असलेल्या गोष्टीवर विचार न करता, हव्या असलेल्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला त्यांनी दिला. यावेळी महिलांसाठी दीपा मालू यांनी विविध मनोरंजनात्मक व बौध्दिक खेळाच्या स्पर्धा घेतल्या. विजेत्या महिलांना मयुरी लूने-गुप्ता यांच्या वतीने बक्षिसे देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा कर्नावट यांनी केले. आभार उषा गुगळे यांनी मानले.