पाच वर्ष पश्चातापाची वेळ येण्यापेक्षा घराणेशाही हाणून पाडा -अॅड. शिवाजीराव डमाळे
अहमदनगर (प्रतिनिधी)- राजनैतिक व्यवस्थेचा परिणाम सामाजिक जीवणावर होत असून, चुकीची राजनैतिक व्यवस्थेत बदल करावा लागणार आहे. मिनी मंत्रालय समजले जाणार्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास होत असून, याकडे नागरिकांनी योग्य उमेदवार निवडण्याची गरज आहे. उमेदवार चुकीचा निवडून दिल्यास पाच वर्ष पश्चातापाची वेळ येण्यापेक्षा घराणेशाही हाणून पाडण्याचे आवाहन सैनिक समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अॅड. शिवाजीराव डमाळे यांनी केले.
सैनिक समाज पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब काळे यांची नियुक्ती करण्यात आली. काळे यांना नियुक्तीपत्र प्रदान करताना प्रदेशाध्यक्ष अॅड. डमाळे बोलत होते. यावेळी दिपक वर्मा, अॅड. राजू शिंदे, राज्य सचिव अरुण खिची, स्वाती गायकवाड, सुभाष अल्हाट, मुस्ताक वस्ताद आदी उपस्थित होते.
पुढे अॅड. डमाळे म्हणाले की, सर्व प्रामाणिक कार्यकर्त्यांची ताकद सैनिक समाज पार्टीच्या मागे उभी राहिल्यास सकारात्मक बदल दिसून येणार आहे. तर रावसाहेब काळे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांनी राजकारणात बदल घडविण्यासाठी सर्वसामान्यांची साथ आवश्यक आहे. समाजातील प्रामाणिक लोक एकवटल्यास क्रांतिकारक बदल होणार असून, सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून प्रमाणिकपणे समाजकार्य करणार्यांना गाव, वाडी-वस्तीवर जाऊन संघटित केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सुभाष अल्हाट म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत सैनिक समाज पार्टीच्या वतीने उमेदवार दिले जाणार असून, याबाबत लवकरच गावोगावी दौरे करुन ग्रामस्थांमध्ये जागृती केली जाणार आहे. भ्रष्ट, घराणेशाही पुढार्यांमुळे विकास खुंटला असून, त्यांना हद्दपार करण्याची वेळ आली आहे. ही व्यवस्था बदलण्यासाठी प्रामाणिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. काळे यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.