अपहारात शासकीय अधिकार्यांनी साखळीने मदत केल्याचे निष्पन्न
अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील आर्थिक घोटाळा दडपण्यासाठी सहकार विभागातील उपनिबंधक सहकार आयुक्त निबंधक कार्यालय पुणे, तत्कालीन सहाय्यक निबंधक पारनेर, वरिष्ठ अधिकारी जिल्हा उपनिबंधक कार्यालय अहमदनगर, वरिष्ठ अधिकारी जिल्हा उपनिबंधक कार्यालय अहमदनगर, जिल्हा विशेष लेखापरीक्षण वर्ग 1 अहमदनगर या शासकीय अधिकार्यांच्या साखळीने मदत केल्याचे निष्पन्न झाल्याने दोषी कर्मचारी आधिकारी यांना बडतर्फ करावे व विभागीय सहनिबंधक आर.सी. शाह यांच्या चौकशीत दोषी ठरलेल्या बँक संचालक, कर्मचारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी 10 मे रोजी सहकार आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचे पत्र सैनिक बँकेचे सभासद कॅप्टन विठ्ठल वराळ, मारुती पोटघन, बाळासाहेब नरसाळे, विनायक गोस्वामी, संपत शिरसाट यांनी सहकार आयुक्त अनिल कवडे यांना दिले आहे.
सहकार आयुक्त यांना देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की, पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील जागृक सभासद अनेक वर्षे बँकेतील झालेल्या भ्रष्टाचार, अपहार बाबत तक्रारी करत होते. त्या तक्रारीवर पारनेर तालुका सहाय्यक निबंधक कार्यालय, जिल्हा उपनिबंधक अहमदनगर कार्यालय व सहकार आयुक्त कार्यालयातील या तीन विभागातील कर्मचार्यापासून ते अधिकार्यापर्यंत या सर्वांनी सैनिक बँकेतील मुख्यकार्यकारी आधिकारी संजय कोरडे व संचालक मंडळ यांच्याशी आर्थिक देवाण-घेवाण करत सदर तक्रारी दडपल्या व काहींची थातुरमातुर तपासणी करत सदर प्रकरणांचा निपटारा केला होता. त्यामुळे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी लक्ष घालत बँकेतील सर्व तक्रारींची सहकार आयुक्तांना पत्र देत चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार नाशिक विभागीय सहनिबंधक आर.सी. शाह यांनी चौकशी केली. त्या चौकशी अहवालात बँक संचालक, कर्मचारी, आधिकारी यांना दोषी धरत त्यांच्यावर कारवाई करण्याची सहकार आयुक्त पुणे यांच्याकडे शिफारस केली होती. त्यानुसार बँकेची कलम 83 ची चौकशी सुरु आहे.
काय आहेत उपोषण कर्त्यांच्या मागण्या!
आर.सी शाह यांच्या अहवालानुसार त्वरित कारवाई व्हावी, बँकेच्या संचालक नातेवाईकांना पुन्हा-पुन्हा कामावर घेतले जात असल्याने त्यांना त्वरित कामावरून कमी करावेत, एकाच दिवशी नियमबाह्य केलेले 1405 सभासद अपात्र घोषित करून त्यांची नावे बँक सभासद रजिस्टर मधून कमी करण्याचा निर्देश बँकेला व्हावा, सैनिक बँकेतील भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारे सहकार विभागातील शासकीय आधिकारी, कर्मचारी यांचे बडतर्फ व्हावे, निराधार योजनेतील रक्कम हडप करणारा भ्रष्ट कर्मचारी सदाशिव फरांडे याला शहा यांच्या अहवालातील शेर्यानुसार बँकेतून बडतर्फ करावे, संचालक मंडळावर गुन्हे दाखल व्हावेत यासह अन्य मागण्या करण्यात आल्या आहेत.
हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली उपोषण
जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांनी सैनिक बँकेतील भ्रष्ट कारभाराला पाठीशी घालणार्या सहकारातील भ्रष्ट आधिकारी व कर्मचार्यांची फाईल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे देणार असून, जिल्हासह राज्यात याच अधिकार्यांमुळेच बँका, पतसंस्थाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे सहकार आधिकारी व सैनिक बँक आधिकारी संचालक मंडळावर कारवाई होण्यासाठीच अण्णा हजारे यांच्या सूचनेनुसार जिल्हातील माजी सैनिक संघटना, सैनिक बँक सभासद, उपोषणास बसणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त बँक सभासद व माजी सैनिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन पारनेर सैनिक बँक बचाव कृती समिती कडून करण्यात आले आहे.