सत्संगाच्या प्रसन्न वातावरणात योग वर्गास विद्यार्थ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सुख योगाच्या वतीने आदर्श गाव हिवरे बाजार (ता. नगर) येथील शालेय विद्यार्थ्यांना योग, प्राणायामाचे धडे देण्यात आले. शहरासह ग्रामीण भागात योग, प्राणायामाच्या प्रचार प्रसारासाठी सुख योगा कार्य करीत असून, या पार्श्वभूमीवर हे शिबीर घेण्यात आले. यामध्ये मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून विविध आसने केली.
पहाटे गिरीराज जाधव यांनी सादर केलेल्या सत्संगने सकाळचे अल्हाददायक वातावरण प्रफुल्लित व प्रसन्न झाले होते. पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते योग वर्गाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर योग गुरु सागर पवार यांनी सुर्यनमस्कार, वीरभद्रासन, उत्कटासन, उत्तरासन, सेतुबंधासन, नटराजासन, त्रिकोनासन आदी आसने प्रात्यक्षिकांसह विद्यार्थ्यांकडून करुन घेतले.
अवघड असलेले विविध आसने त्यांनी सोप्या पध्दतीने करण्याचे प्रात्यक्षिक दाखवून त्याचे महत्त्व व निरोगी शरीरासाठी असलेले फायदे विशद केले. त्यानंतर विद्यार्थ्यांना प्राणायाम शिकविण्यात आले. यावेळी किरण गायकवाड, मोहसीन सय्यद, सागर ढवण, गायत्री गार्डे, ऋतूजा हेडा, प्राची घुले, माधवी दांगट, अपर्णा धरम, श्रीराम दिवटे, पांडूरंग दातीर, निलेश हेडा, ऋतुजा हेडा, आशिष कुमार, डॉ. प्रफुल्ल चौधरी, कल्याणी चौधरी, महाजन, रासने, मयुरी चव्हाण, कविता कुमावत, यशस्विनी ससे, मोक्षी बोरा, धनश्री गायकवाड, अंतून वारुळे, श्रेयश लगड, अक्षय शर्मा आदी उपस्थित होते.
पद्मश्री पोपट पवार म्हणाले की, उत्तम आरोग्यासाठी योग-प्राणायाम जीवनाचा अविभाज्य अंग बनला पाहिजे. स्पर्धेच्या व धावपळीच्या युगात प्रत्येक व्यक्ती व्यायामापासून दुरावत असून, ताण-तणावाखाली वावरत आहे. चुकीची आहार पध्दती, व्यायामाचा अभाव व तणावपूर्ण जीवनामुळे बहुतेकांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. जीवन निरोगी व शरीर सदृढ राहण्यासाठी नागरिकांनी योग-प्राणायाम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.