बहुजन समाज पार्टीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
मतीमंद युवकापासून परिसरातील नागरिकांना धोका असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- बोल्हेगाव रोड, सावेडी गावठाण येथे मतीमंद असलेल्या युवकाने महिलेवर हल्ला केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात पोलीसात गुन्हा दाखल केल्यानंतर, सदर युवकाच्या आईने तोफखाना पोलीस स्टेशनला दाखल केलेली खोट्या क्रॉस कम्प्लेटचा योग्य तपास करुन न्याय देण्याच्या मागणीचे निवेदन बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले. यावेळी जिल्हा महासचिव राजू शिंदे, विधानसभा अध्यक्ष प्रतीक जाधव, शहर महासचिव सिद्धार्थ पाटोळे, शहर सचिव अतुल जाधव, शहराध्यक्ष संतोष जाधव, विजय गायकवाड, गणेश बागल, अक्षय पाडळे, मयूर भिंगारदिवे आदी उपस्थित होते.
बहुजन समाज पार्टीचे शहराध्यक्ष संतोष जाधव यांच्या वहिनी घरी असताना शेजारी राहणार्या छोटू जाधव हा युवक हातात कुर्हाड घेऊन अंगावर धावून आला. त्याला प्रतिकार केला असताना त्यांनी जवळ असलेली वीट मारुन सिमा सचिन जाधव यांना जखमी केले. सिमा जाधव यांनी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये त्या युवकाविरोधात हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. ही बाब सदर युवकाच्या आईला समजल्यानंतर त्यांनी रात्री साडेआठच्या सुमारास घरासमोर येऊन शिवीगाळ व जीवा मारण्याची धमकी देऊ लागले. संतोष जाधव यांनी कंट्रोलरुमला हा प्रकार फोन करुन सांगितला असता, तोफखाना पोलीस स्टेशनचे फिरते पथक सावेडी गावठाण येथे आले. मात्र संबंधितांवर कारवाई न करता हे तपास अधिकार्याचे काम असल्याचे सांगून निघून गेले.
यामधील आरोपी असलेला युवक मतीमंद असून, त्याला त्याची आई घरी एकटा सोडून जाते. त्यापासून नागरिकांना धोका निर्माण झाला असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. या युवकाची कोणी तक्रार केल्यास त्याचे घरचे उलट त्यांनाच दमदाटी करतात. या मुलाविरोधात पोलीसात गुन्हा दाखल केल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर आरोपीची आई व त्याच्या मामाने तोफखाना पोलीस स्टेशनला संतोष जाधव यांच्या कुटुंबीयांविरोधात खोटा गुन्हा दाखल केल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
या प्रकरणात ठाणे अमलदारांनी या प्रकरणाची शहानिशा न करता खोटा गुन्हा दाखल करुन घेतला असून, या प्रकरणी चौकशी करुन खोटा गुन्हा मागे घ्यावा. या प्रकरणाची कल्पना देऊन देखील कारवाई न करणार्या फिरते पथकातील पोलीसांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.